भूम (प्रतिनिधी)- रविवारी रात्री पडलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे भूम शहरातील कसबा आणि पेठ या विभागाला जोडणाऱ्या पुलांचा लोखंडी कठडा पूर्णपणे वाहून गेला. तर शहरातील स्मशानभुमी पावसामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. भूम शहरात अनेक भाग जलमय झाला होता.
भूम तालुक्यासह परिसरात दि. 22 सप्टेंबर रोजी पहाटे ढगफुटी सदृश्य झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील साडेसांगवी, चिंचपूर, बेलगाव मध्ये पाणी शिरल्याने अनेक शेतकऱ्यांची 150 ते 200 लहान-मोठे जनावरे पाण्यामध्ये वाहून जाऊन दगावले असल्याचे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात येत आहे.
मध्यरात्री 11 वाजल्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. बाणगंगा व रामंगगा नदीचा साडेसांगवी येथे संगम होत असल्याने नदीने पाणी पातळी ओलांडल्यानंतर साडेसांगवी गावामध्ये मध्यरात्री पाणी शिरले. नागरिकांनी सतर्कता करत स्वतःचा जीव वाचवत सुरक्षित ठिकाणी प्रस्थान केले. मात्र या पुराच्या पाण्यामध्ये मुके जनावरे वाहून गेले व दगावली असल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे. अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने घरातील वस्तू अस्तावस्त अवस्थेमध्ये पडलेल्या आहेत. घरातील धान्य पूर्णपणे भिजले आहे. मुका जनावरांसाठी साठवून ठेवलेला कडबा वैरण पुराच्या पाण्याने वाहून गेली आहे. अशाप्रकारे तालुक्यातील व परिसरातील ग्रामीण भागामधील व शहरी भागामधील जनजीवन मुसळधार पावसाने विस्कळीत झाले आहे. साडेसांगवी गावामध्ये तहसीलदार जयवंत पाटील, पोलीस निरीक्षक गणेश कानगुडे यांच्यासह महसूल व पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी भेट देवून नुकसानीची पाहणी केली आहे.
रविवारी झालेल्या मुळसाधार पावसामुळे भूम शहरातील आबासाहेब मस्कर यांचा आठ एकर मधील ऊस मोडून पडला. त्याचप्रमाणे भूम तालुक्यातील बेलगाव येथील शेतकरी सोमनाथ दातखिळे यांचे 17 जनावरे जाग्यावर मेली. तर 10 गायी वाहून गेल्या. ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे भूम शहराचा बार्शी- परंड्याशी संपर्क तुटला होता.