धाराशिव (प्रतिनिधी) -रामकृष्ण परमहंस महाविद्यालय,धाराशिव येथे दि. 20/09/2025 रोजी 'शासन आपल्या दारी'या उपक्रमांतर्गत समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त मा. सचिन कवले सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शासनाच्या विविध योजनांचा फायदा हा गरीब सर्वसामान्य विद्यार्थ्यांना झाला पाहिजे ही भूमिका समाज कल्याण विभागाची आहे. विद्यार्थ्यांचा विकास हा देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्तम भूमिका बजावत असतो हा विषय त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला. स्वाधार, योजना, फ्री शिप, स्कॉलरशिप या विषयांची सविस्तर माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. शासनाची बार्टी, महा ज्योती, सारथी सारख्या विविध संस्थांची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणाऱ्या जात पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता त्यांनी नमूद केली . सदर जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठीची कार्यवाही त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना सांगितली. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संदीप देशमुख सर यांनी शिक्षण महर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांनी स्थापन केलेल्या श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगितला. गरीब, तळागाळातील सर्वसामान्य लोकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे व त्यांचा सर्वांगीण विकास साधने हे व्रत शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी आयुष्यभर जोपासले व पुढील काळात गुरुदेव कार्यकर्त्यांनाही हीच शिकवण त्यांनी दिली. कार्यक्रमासाठी जूनियर विभागाचे उपप्राचार्य बी.एस. सूर्यवंशी व सर्व गुरुदेव कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वैभव आगळे व प्रा. मोहन राठोड यांनी केले.सदर कार्यक्रम प्रभारी प्राचार्य डॉ.संदीप देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

 
Top