धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत 'श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सव' तुळजापूर येथे आयोजित करण्यात आला आहे . यामध्ये स्थानिक लोककला, लोकनृत्य, अंबाबाईचे गोंधळी गीत, भारुड, जाखडी इत्यादी लोक कलाप्रकारांचा समावेश करण्यात आलेला आहे. परंतु या महोत्सवा मध्ये जिल्ह्यातील स्थानिक कलावंतांना सहभागी किंवा संधी देण्यात आली नाही.स्थानिक कलावंतांना संधी न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलन करण्याचा ईशारा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नियामक मंडळाचे सदस्य विशाल शिंगाडे यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी शुक्रवार 19 सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत सन 2025-26 या वित्तीय वर्षात आयोजित करण्यात येणाऱ्या महोत्सवाच्या दिनदर्शिकेमध्ये 'श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सव' या महोत्सवाचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये स्थानिक लोककला, लोकनृत्य, अंबाबाईचे गोंधळी गीत, भारुड, जाखडी इत्यादी लोक कलाप्रकारांचा समावेश करण्यात आलेला आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा धाराशिव ही मागील 24 वर्षापासून सांस्कृतिक व लोककला जोपासण्यास अग्रेसर राहिलेली आहे. यामध्ये शाखेकडे जवळपास 70 कलाकार तुळजाभवानी देवीचे आराधना करणारे आराधी, जोगवा, गोंधळी, पोतराज लोकनृत्य व लोकगीत, भारुड, वासुदेव, वाघ्या-मुरळी, जोगत्या जोगतीन इत्यादी कला प्रकार आम्ही सादर करत आलेलो आहोत.
हे लोकनृत्य आत्तापर्यंत क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे व सांस्कृतिक संचालनालय, च्या वतीने महाराष्ट्र आणि देशभर कार्यक्रम केलेले आहेत. युवा महोत्सवामध्ये घेण्यात येणाऱ्या लोकनृत्य कला प्रकारात सात वेळेस राष्ट्रीय पातळीवर सादर केलेले आहेत.
सन 2023 मध्ये नाशिक येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि भारत सरकार च्या माध्यमातून घेण्यात आलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये आमच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवून लोकनृत्यामध्ये महाराष्ट्राचे नाव देशभरात गाजवले आहे. या अनुषंगाने तुळजापूर येथे होणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये स्थानिक कलावंत म्हणून संधी देण्यात यावी.
आमच्या सर्व कलाकारांचा उदरनिर्वाह कलेवरतीच अवलंबून आहे. तसेच लोप पावत चाललेल्या जिल्हयातील कला जोपासण्याचे काम आम्ही करत आलेलो आहोत. आम्हाला जर सलग दहा दिवस कार्यक्रम देण्यात नाही आले तर आपल्या आवारात सलग दहा दिवस तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे.
दिलेल्या निवेदनावर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कार्यकारणी सदस्य विशाल शिंगाडे, सुगत सोनवणे, शशिकांत माने, सतीश ओहळ, सुरेश देवकुळे, सुहास झेंडे, शुभम खोत, विश्वनाथ काळे, आलम बेग, यशवंत शिंगाडे,सुमित शिंगाडे, जितेंद्र बनसोडे,विजय उंबरे,रोहित शिंगाडे आदींच्या सह्या आहेत.