भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. नदी-ओढे ओसंडून वाहत असून गावांतील पूल पाण्याखाली गेले आहेत. अशातच भूम शिवारातील शेंडगे वस्ती शिवारात असणारा साठवण तलाव सध्या अतिशय धोकादायक स्थितीत पोहोचला आहे.
तलावाचा सांडवा पूर्णपणे कोसळल्याने तलाव कधीही फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याआधीच दोन दिवसांपूर्वी साबळेवाडी येथील लघु तलाव फुटल्याने बाणगंगा नदीला पूरस्थिती निर्माण झाली होती व शेतांचे प्रचंड नुकसान झाले होते.
शेंडगे वस्तीतील तलावाची भिंत कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काँग्रेस तालुका अध्यक्ष रुपेश शेंडगे यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांनी वेळोवेळी तलावाची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती, परंतु लघुपाटबंधारे विभागाचे हनवटे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आता तलाव फुटल्यास सर्वस्वी अधिकारी जबाबदार असतील.“ तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख अनिल शेंडगे यांनी इशारा देताना सांगितले की,“तलाव फुटल्यास भूम शहरालगतची तब्बल 1500 एकर शेती बाधित होईल. शहरालाही पूरस्थिती निर्माण होऊ शकते. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.“
या प्रकरणी लघुपाटबंधारे विभागाचे हनवटे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,“तलावाच्या दुरुस्तीचे काम मंजूर आहे, परंतु काही शेतकऱ्यांच्या विरोधामुळे ते होऊ शकले नाही. तरीही आता परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न करू.“ सध्या तलाव तुडुंब भरला असून पाऊस कायम राहिल्यास कधीही गंभीर दुर्घटना घडू शकते.