तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेस शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या दहीदूध पंचामृत अभिषेक पूजेच्या ऑनलाईन पास प्रक्रियेवर संशयाचे सावट आले आहे. या वेबसाईटवरील तांत्रिक त्रुटी, कर्मचाऱ्यांची भूमिका आणि पास मिळविण्यासाठी झालेला प्रचंड गोंधळ यामुळे भाविक आणि पुजारीवृंदात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
22 ते 25 सप्टेंबर 2025 या कालावधीत ऑनलाईन पास काढण्यासाठी हजारो भाविकांनी रात्रीभर जागून प्रयत्न केले. मात्र पंधरा मिनिटांत बुकींग फुल्ल झाल्याचे संशयास्पद प्रकार वारंवार दिसून आले. त्यामुळे, प्रत्यक्ष भाविकांना पास मिळविणे कठीण झाले असून “बुकींग प्रक्रियेत पारदर्शकता नाही” असा आरोप भाविकांकडून होत आहे. या प्रकरणी, वेबसाईट चालवणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह अनेक अदृश्य हात बाबतीत संशय व्यक्त केला जात आहे. नवरात्रोत्सवासारख्या महत्त्वाच्या काळात घाईगडबडीत ही वेबसाईट का सुरू करण्यात आली, याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
भाविकांचा आरोप आहे की, टेक्निकल माध्यमातून संगनमताने पास बुकींगवर डल्ला मारला गेला. “ऑनलाईन प्रणाली हॅक होऊन मंदिराची बदनामी करण्याचा प्रयत्न आहे का?” हा गंभीर सवालही पुढे येत आहे. विशेष म्हणजे, नवरात्रोत्सवात अभिषेक करणाऱ्यांची संख्या हजारोंमध्ये असल्याने त्याचा गैरफायदा घेऊन आर्थिक व्यवहार झाले का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
मंदिर समितीकडे भाविक आणि पुजारीवृंदाचा एकच सूर आहे. “ऑनलाईन पास प्रक्रियेत पारदर्शकता आणा आणि दोषींवर कारवाई करा.” या प्रकरणी पुजारी मंडळ तसेच बाळासाहेब भोसले व अनेक संघटनांनी जिल्हधिकारी यांना निवेदने दिले आहे मंदीर प्रशासन या बाबतीत काय भूमिका घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.