धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धाराशिवमार्फत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी सैनिक,त्यांच्या पत्नी व पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत एकवेळ आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

या योजनेत खेळ,शैक्षणिक क्षेत्र, सामाजिक कार्य,पर्यावरण संवर्धन, यशस्वी उद्योजकता तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये केलेल्या बहुमोल कार्यासाठी पात्र लाभार्थ्यांचा सन्मान केला जाणार आहे. विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात सन 2024 -25 मध्ये 10 वी व 12 वीच्या परीक्षेत 90 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणारे पाल्य,तसेच IIT, IIM, AIIMS सारख्या नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळविलेले माजी सैनिकांचे पाल्य या योजनेस पात्र ठरणार आहेत. त्याचबरोबर खेळ क्षेत्रात राष्ट्रीय,राज्यस्तरावरील किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी केलेले,साहित्य,संगीत,नृत्य,गायन, वादन आदी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेले, तसेच कृषीक्षेत्रात भरघोस उत्पन्न घेणारे माजी सैनिक शेतकरी यांचाही गौरव करण्यात येणार आहे. या योजनेसाठी इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धाराशिव येथून घ्यावेत व 10 सप्टेंबर 2025 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन स्क्वॉड्रन लीडर विद्यासागर कोरडे (नि.),जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,धाराशिव यांनी केले आहे.

 
Top