कळंब (प्रतिनिधी)- नवरात्रोत्सव मोठ्या जल्लोसात सुरुवात झाली. त्यादृष्टीने सध्या शहरातील अंबाबाई देवीच्या मंदिरांत दि . 22 रोजी विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली . या ठिकाणी देवीच्या मंदिर परिसराची साफसफाई करण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे देवीच्या मंदिराला रंगरंगोटी करता आली नाही. आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून दहा दिवस या मंदिरात आरती, जोगवा, भारुड, प्रवचन, धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. दहा दिवस या परिसरात विविध खेळण्याची दुकाने, पान फुलांची दुकाने, खाद्यपदार्थांची स्टॉल, लहान मुलांच्या मनोरंजनाची साधने येथे येतात व सायंकाळी दर्शनासाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
दरवर्षी या अंबाबाई मंदिरात मोठ्या उत्साहात घट स्थापना केली जाते.दहा दिवस मोठ्या भक्तीभावात मंदिर परिसर गजबजलेला असतो. यंदाचे नवरात्र दहा दिवसांचे आहे.देवीचे हे मंदिर शहराच्या मध्यवस्तीत येते. नवसाला पावणारी देवी म्हणून तिची ओळख आहे. दर मंगळवार शुक्रवार व नवरात्र उत्सवात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी येथे असते. मंदिर समितीच्या वतीने मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. देवी मंदिराची साफसफाई पूर्ण झाली असून नवरात्र उत्सवात भक्तांना चहा, पाणी, कॉफी, दूध, राजगिरा लाडू, केळी, साबुदाणा खिचडी आदींचे प्रसाद म्हणून वाटप करण्यात येते. दरम्यान, 22 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे.अंबाबाई पुरातन देवी मंदिर हे कळंब मधील सर्वात जुने मंदिर आहे. हे देवी मंदिर सर्व कळंबकरांचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. मंदिरात दिवसभर दर्शन घेण्यासाठी भाविक भक्त येत असतात. मंदिरात दररोज सायंकाळी सात वाजता देवीची आरती केली जाते.यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त उपस्थित असतात. शासकीय नोकरी किंवा व्यापार निमित्त बाहेरगावी राहत असलेले कळंबकर दरवर्षी नवस फेडण्यासाठी नित्यनेमाने देवी मंदिरात येत असतात.दरवर्षीप्रमाणे आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या शेकडो दिंड्यातील वारकरी या देवी मंदिरात दरवर्षी मुक्कामी थांबतात. वंशपरंपरागत पुजारी राहुल जगन्नाथ मुळे हे पाडवा, नवरात्र महोत्सव, दीपावली, स्वातंत्र्य दिन व शिवजयंती सह अनेक धार्मिक कार्यक्रमाचे मंदिरात आयोजन करतात या मंदिरात विविध उत्सव साजरे केले जातात. येथे पूजा अर्चा व साफसफाईचे काम चार पिढ्या पासून वंशपरंपरागत पुजारी असलेला मुळे परिवार करत आला आहे.
देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे नगर पालिकेने तातडीने खड्ड्याची डागडुजीसाठी करावी अशी मागणी भाविकामधून होत आहे.