भूम (प्रतिनिधी)- सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार भूम पोलीस स्टेशन अंतर्गत डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
तालुक्यासह शहरात भूम पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गणेश मंडळामध्ये 78 तरुण मंडळांनी गणेशोत्सवाची स्थापना केली होती. त्यामध्ये तालुक्यातील 23 गावामध्ये एक गावे गणपती स्थापन करण्यात आला. शहरासह तालुक्यात 53 मंडळाने विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबवत गणेशोत्सव मिरवणूक शांततेत पार पाडली. यावेळी भूम शहरामध्ये उपविभागीय अधिकारी रेवैयाह डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले, प्रभारी तहसीलदार प्रवीण जाधव यांच्या उपस्थितीत नगरपरिषद समोर गणेश मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.
चौंडेश्वरी तरुण व एकता मंडळ, नागोबा तरुण गणेश मंडळ, भवानी तरुण गणेश मंडळ यांच्या वतीने विविध सांस्कृतिक सामाजिक उपक्रम गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये सादर करण्यात आले. सकाळपासूनच शहरातील बाणगंगा तलाव येथे बाल गणेश मंडळ, तरुण गणेश मंडळ तसेच घरातील गणपतीचे विसर्जन करताना नागरिकांनी गर्दी केली होती. तसेच श्रीमंत समर्थ नगर तरुण गणेश मंडळाने शेवटच्या दिवशीही विविध लेझीम पथक, लहान मुलींचे टिपऱ्या, महिलांचे लेझीम पथक तसेच विविध गाण्यावर डान्स गणपती समोरच सादर केले. काही गणेश मंडळांना ऐन वेळेस वाद्य न मिळाल्यामुळे गणपती विसर्जन जागेवरच केले. यावर्षी डीजे मुक्त गणेश विसर्जन मिरवणूक असल्यामुळे बहुतेक गणेश मंडळांनी आपापल्या गणेश मूर्ती समोरच विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महाप्रसादाचेही आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आल्याचे दिसून आले. भूम पोलीस स्टेशन अंतर्गत सर्व ठिकाणी चोख असा बंदोबस्त उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवण्यात आला होता.
