परंडा (प्रतिनिधी)- परंडा तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निवेदन भारतीय जनता पार्टी परंडा च्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले. तालुक्यातील अनाळा व परंडा मंडळात 1400 शेतकऱ्यांच्या 596 हेक्टर क्षेत्रात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. सिना कोळेगाव प्रकल्प, चांदनी प्रकल्प, खासापुरी प्रकल्प आणि साकत प्रकल्प या पाणलोट क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन, उडीद, तुर, कांदा, ऊस आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी भाजपा परंडा च्या वतीने मागणी करण्यात आली आहे.


 
Top