धाराशिव (प्रतिनिधी)- मागील पाच वर्षांत प्रियदर्शिनी इंदिरा गांधी महिला सहकारी पतसंस्थेने अल्पावधीत केलेली प्रगती ही केवळ आर्थिक शिस्तीची फलश्रुती नसून, सभासदांच्या निष्ठा व संचालक मंडळाचा प्रामाणिक प्रयत्नांचा परिणाम आहे. संस्थेच्या माध्यमातून ग्राहकाभिमुख योजना, तसेच भविष्यात नैसर्गिक आपत्ती मदत निधी व शैक्षणिक मदत निधी उभारला जाणार आहे.हे केवळ आर्थिक व्यवहारा पुरते मर्यादित न राहता समाजहित देखील साध्य होणार आहे. संस्थेच्या सभासदांचा विश्वास हाच आमचा श्वास असल्याचे प्रतिपादन प्रियदर्शिनी इंदिरा गांधी महिला सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष डॉ. स्मिता शहापूरकर यांनी केले.
प्रियदर्शिनी इंदिरा गांधी महिला सहकारी पतसंस्थेच्या पाचव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन रविवार, 7 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता आयोजन केले होते. त्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्ष म्हणून बोलत होत्या. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था धाराशिवचे सहाय्यक निबंधक अंबिलपुरे यांनी सभेचे उद्घाटन केले. सचिव डॉ. ज्योती कानडे यांनी अहवाल व आर्थिक पत्रके सादर केली. संस्थेच्या कामकाजाबाबत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यावर भर देण्यात आला.
कार्यक्रमात धाराशिव जिल्हा पत्रकार संघ व नगर वाचनालय धाराशिवच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष देवीदास पाठक, नगर वाचनालयचे अध्यक्ष तथा मसापचे अध्यक्ष नितीन तावडे, उपाध्यक्ष इतिहास संशोधक डॉ. सतिश कदम, सहकार खात्याचे प्रशिक्षक मधुकर जाधव यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी संस्थेच्या उत्कृष्ट सभासद, ग्राहकांचा सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात प्रियदर्शनी इंदिरा गांधी पुरस्कार देण्याचा ठराव जाहीर करण्यात आला. यंदाचा पहिला पुरस्कार कवी, पत्रकार रवींद्र केसकर, कवयित्री भाग्यश्री वाघमारे-केसकर, सफल केसकर आणि प्रबल केसकर यांना प्रदान करण्यात आला. डॉ. स्मिता शहापूरकर यांनी केसकर कुटुंबीयांची घेतलेली मुलाखत भावपूर्ण ठरली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतसंस्थेच्या अध्यक्ष डॉ. स्मिता शहापूरकर यांनी केले. यावेळी पतसंस्थेच्या सचिव डॉ. ज्योती कानडे आणि संचालक सुरेखा काशिद, पूनम जाधव, सुरेखा जगदाळे, रोहिणी नायगावकर, उषा वाडे, तज्ज्ञ संचालक धनंजय कुलकर्णी, व्यवस्थापक अलका वीर, सर्व कर्मचारी वर्ग व सभासद नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने सभेची सांगता करण्यात आली. अत्यंत उत्साहात सभा पार पडली.
प्रियदर्शिनी इंदिरा गांधी महिला सहकारी पतसंस्थे मध्ये एकूण 77 लाख 60 हजारांच्या ठेवी तर 55 लाख रूपयांचे कर्ज देण्यात आले आहे. संस्थेचे एकूण 768 सभासद असून वसुल भाग भांडवल 12 लाख 54 हजार आहे. या संस्थेचा एन.पी.ए.चे प्रमाण 0.59 टक्के आहे. तर संस्थेचा ऑडीट वर्ग अ आहे. पुढील काळात संस्थेमध्ये लॉकर्स सुविधा, सोने तारण, विस्तारीत कक्ष आदी सुविधा देण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे.
