भूम (प्रतिनिधी)-  परंपरागत चालत आलेल्या कलाकारांना शासनाकडून अपेक्षित लाभ कुठलाच मिळत नाही. योजना जाहीर होतात, परंतु त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही. प्रत्येकाला त्याच्या कलेनुसार न्याय मिळाला पाहिजे. यासाठी कलाकारांनी संघटनात्मक चळवळीत सहभाग घ्यावा. असे आवाहन मराठवाडा लोकविकास मंडळ व वृद्ध साहित्यिक कलाकार संघटनेच्यावतीने आयोजित केलेल्या दोन दिवशीय कला महोत्सवाच्या समारोप प्रसंगी सर्जेराव इंदलकर यांनी केले.

भूम येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये मराठवाडा लोककला विकास मंडळ व साहित्यक कलाकार संघटनेच्या वतीने दोन दिवस कला सादरीकरण महोत्सव घेण्यात आला. दोन दिवसाच्या कला महोत्सवास कलाकार संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव इंदलकर व त्यांचे सहकारी वृद्ध कलाकार व साहित्यिक मानधन निवड समितीचे सदस्य शंकर खामकर, हभप सुधीर महाराज खोचरे, धर्मदूत अरुण अण्णा शाळू,  थोबडे महाराज,  पुरुषोत्तम गजरे महाराज, शशिकला गुंजाळ, साहित्यिक सौ अलका सपकाळ, कलाकार संघटनेचे अध्यक्ष श्रीमती मंदाताई बोराडे, पत्रकार नंदकुमार देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होत. कला महोत्सव दरम्यान आरोग्य, पत्रकार, शैक्षणिक, सामाजिक, उदयोग, प्रशासकिय क्षेत्रातील उत्कृष्ठ कार्य करणाऱ्याचा शाल, श्रीफळ, फेटा, सन्मानपत्र, सन्मान चिन्ह देवून सन्मान करण्यात आला. दोन दिवस चाललेल्या कला महोत्सवामध्ये 35 आराधी मंडळ व 40 भजनी मंडळाने सहभाग घेऊन कला सादरीकरण केले. 

कला महोत्सवामध्ये आराधी मंडळ स्पर्धेत दरेवाडी व आरसोली येथील आराधी मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. रामेश्वर व नागेवाडी येथील आराधी मंडळाने द्वितीय क्रमांक तर गोलेगाव व सोनगिरी येथील आराधी मंडळाने तृतीय क्रमांक मिळवला. प्रोत्साहनपर बक्षीस अनिता काळे यांना देण्यात आले. तसेच भजनी मंडळ प्रकारामध्ये दराडे वस्ती रामेश्वर व भवानवाडी भजनी मंडळाने प्रथम क्रमांक मिळवला. जिजाबाई भजनी मंडळ सोनगिरी व तात्या शिंदे भजनी मंडळ यांनी द्वितीय क्रमांक मिळाला. यात प्रोत्साहन पर बक्षीस जयदीप हवालदार यांना देण्यात आले. सुत्रसंचलन दादासाहेब दळवी यांनी केले.

 
Top