धाराशिव (प्रतिनिधी)- केशेगांव (ता. धाराशिव) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याची सन 2024-25 या आर्थीक वर्षाची 28 वी अधिमंडळाची वार्षीक बैठक कारखान्याचे अध्यक्ष अरविंद गोरे यांचे अध्यक्षतेखाली रविवार दि.31/08/2025 रोजी कारखाना साईट, अरविंनदनगर येथे उत्साहात संपन्न झाली.

कारखाना कामकाजास सुरुवात करणेपूर्वी उपस्थित सभासदांचे स्वागत श्री. गोरे यांनी केले. तसेच कार्यकारी संचालक एस.पी.डाके यांनी विषय सुचीचे वाचन केले. सभेच्या कामकाजास सुरुवात करणेपुर्वी कारखान्याचे चेअरमन मा.गोरे यांनी अहवाल सालात दिवंगत झालेल्या व्यक्तींना श्रध्दाजंली वाहुन वार्षिक बैठकीच्या कामकाजास सुरुवात केली. त्यानंतर मांडलेल्या सर्व ठरावास उपस्थित सभासदांनी टाळयांच्या गजरात मान्यता दिली.

यावेळी अरविंद (दादा) गोरे यांनी सभेस मार्गदर्शन करताना सांगीतले की, शेतकऱ्यांनी लवकर पक्व होणाऱ्या कोसी 671 व एमएस 10001 या ऊस जातीची प्राधान्याने लागवड करणे गरजेचे आहे. या अनुषंगाने कारखान्याने 15 नोव्हेंबर पुर्वी या दोन ऊस जातीच्या रोपाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यास हेक्टरी 5000 रु. कारखाना रोप अनुदान देणार असल्याचे सांगीतले. ऊस रोपांची लागण जास्तीत जास्त प्रमाणात होण्याच्या दृष्टीने ऊस बेणे मळ्यासाठी शेतकऱ्यांना ट्रे व कोकोपीट डेपो कारखान्यावर उपलब्ध करून देण्यात येईल. कृत्रिम बुध्दीमत्ता तंत्राज्ञानाच्या वापरासाठी रु.25000 एकूण खर्च असून यावर्षी प्रायोगीक तत्वावर सवलत दिली असून यामध्ये शेतकरी 9000, कारखाना 6750 व व्हीएसआय, पुणे 9250 अशी खर्चाची विगतवारी करण्यात आली आहे. यामुळे पाणी बचत, खर्चात 30 टक्के बचत, तसेच 30 टक्के उत्पादनात वाढ होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

कारखाना गट रचना नविन पध्दतीने करून एकूण 34 गट तयार करण्यात आले असून प्रति गट 400 हे. क्षेत्रानुसार यंत्रणा भरतीमध्ये मिनी 240 मोठी वाहने 160 तसेच हार्वेष्टर 45 याप्रमाणे प्रतिदिन 8000 मे. टन ऊस पुरवठा क्षमतेची तोडणी यंत्रणा भरती करण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले. तसेच यावर्षी हार्वेष्टर वाहनासाठी दुसरा ट्रिपलर बसविणेत आला आहे.

यावर्षी यंत्रसामुग्रीचा पूर्ण क्षमतेने वापर होईल. प्रतितास 275 सरासरीने प्रतिदिन 6000 मे.टन गाळप होऊन 150 दिवसात 9 लाख मे.टन गाळपाचे उद्दीष्टानुसार वीज निर्यात 4 कोटी युनिट पर्यंत होईल तसेच साखर उतारा 11 च्या पुढे राहून साखर निर्माती 15 टक्के एम 30, एसएस30 40 टक्के, एस30 35 टक्के होईल. प्रतिदिन 6000 टन गाळप दरामुळे 31 हजार टन बर्गेज शिल्लक राहून आसवाणी प्रकल्पाकडे सिरपपासून 45 लाख बी हेवी पासुन 150 लाख इथेनॉल निर्मीतीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच कारखाना नोंदीतील सर्व ऊस मार्च 2026 अखेर संपवणेचे नियोजन व भागातील सर्व ऊस संपलेशिवाय कारखाना बंद न करणेचे नियोजन केल्याचे सांगीतले.

यावेळी कारखान्याचे संचालक मंडळ, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारखान्याचे संचालक ॲड. निलेश पाटील यांनी सभा संपलेचे जाहीर करुन उपस्थित सभासद, महिला सभासद, अधिकारी, कर्मचारी यांचे आभार मानले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्याच्या 28 व्या वार्षीक बैठकीस संबोधीत करताना अरविंद गोरे, सर्व संचालक मंडळ सदस्य व उपस्थित सभासद वर्ग.

 
Top