धाराशिव (प्रतिनिधी)- अकरावी प्रवेशाच्या जागा रिक्त राहिल्याने शासनाकडून परत एकदा मुदतवाढ मिळाली आहे. अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी होणार असून, 5 सप्टेंबर रोजी रिक्त जागाची माहिती मिळणार आहे.
सप्टेंबर महिना उजाडला तरी अजूनही अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरूच आहे. शिक्षण संचालनालयाने दुसरी विशेष फेरी घेतल्यानंतरही धाराशिव जिल्ह्यात 13,407 जागा रिक्त आहेत. त्यामुळे प्रवेशाची आणखी एक फेरी होणार असून, बुधवार दि. 3 सप्टेंबरपासून नवीन नोंदणी सुरू झाली आहे. दि. 5 सप्टेंबरला रिक्त जागांची माहिती मिळेल. विद्यार्थी दि. 6 व 7 सप्टेंबरदरम्यान आपल्या पसंतीक्रम भरू शकतील. दि. 8 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजेपासून 9 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजेपर्यत प्रत्यक्ष प्रवेश घ्यावे लागणार आहेत. ऑगस्ट महिन्याअखेरीस सुरू झालेली दुसरी विशेष फेरी ही अंतिम फेरी होणार होती. मात्र शिक्षण संचालनालयाने या प्रवेश प्रक्रियेची आणखी एक फेरी घेण्याचे निश्चित केले आहे.