धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आणि बृहन महाराष्ट्र योग परिषद यांच्या अधिपत्याखाली छत्रपती संभाजी नगर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या वरिष्ठ गटातील राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत धाराशिव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या योगपटूंनी 2 सुवर्ण व 1 कांस्यपदक पटकाविले आहे.
छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे घेण्यात आलेले या स्पर्धेत 28 ते 35 वर्ष महिला वयोगटात सीमा चौरे यांनी लेग बॅलन्स प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे, 35 ते 45 वर्ष पुरुष वयोगटात सतीश साबळे यांनी ट्विस्टिंग प्रकारात सुवर्णपदक पटकाविले तर याच वयोगटात सुपैन प्रकारात परमेश्वर चौरे यांनी कास्यपदक पटकावले आहे. भारतीय योगासन स्पोर्ट्स महासंघाच्या अधिपत्याखाली छत्तीसगड योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने छत्तीसगड येथे होत असलेल्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी लेग बॅलन्स प्रकारात सीमा चौरे आणि ट्विस्टिंग प्रकारात सतीश साबळे यांची महाराष्ट्र संघात निवड झाली असून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
दरम्यान धाराशिव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने असोसिएशनचे अध्यक्ष अतुल अजमेरा यांच्या हस्ते विजेत्या योगपटूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष गौरव बागल, सचिव प्रवीण गडदे, कोषाध्यक्ष अध्यक्ष वाघोलीकर, सहसचिव राजेश बिलकुले व योगेश थोरबोले आदींसह संघटनेचे पदाधिकारी व योगप्रेमींचे उपस्थिती होती.
