धाराशिव (प्रतिनिधी)- कुलस्वामिनी तुळजाभवानी माता छत्रपती शिवरायांना आशीर्वाद देत असतानाचे 108 फूट उंचीचे भव्य शिल्प साकारण्यासाठी पाच प्रतिकृतींची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तज्ञांच्या समितीची सोमवारी मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. देशभरातील शिल्पकारांनी सादर केलेल्या एकूण 14 शिल्प प्रतिकृतींपैकी पाच प्रतिकृतींची निवड समितीकडून करण्यात येणार आहे. त्यानंतर अष्टभुजा 'शिवभवानी'चा अंगावर शहारे आणणारा प्रेरणादायी विचार सर्व भाविकांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.'मित्र'चे उपाध्यक्ष तथा तुळजापुरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून या शिल्पाची उभारणी केली जात आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याअंतर्गत तुळजाभवानी मातेचे 108 फुट उंचीचे ब्राँझ धातूचे शिल्प साकारण्यात येणार आहे. श्री तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद देत असतानाचे हे शिल्प असणार आहे. हे शिल्प कसे असावे, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत शिल्पकारांना अडीच ते तीन फूट उंचीचे फायबरचे मॉडेल कला संचालनालयाकडे (मुंबई) 1 ते 31 ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
माहिती केंद्रही उभारले जाणार
या नियोजित भव्य शिल्पामुळे भाविकांना केवळ धार्मिक अनुभूतीच नव्हे तर राष्ट्रनिर्माते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपतींचे प्रेरणास्थान असलेल्या आई तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद घेत असलेला अद्वितीय आणि अनुपम देखावा देखील अनुभवता येणार आहे. हे शिल्प श्रद्धा आणि प्रेरणेचे रोमांचक प्रतीक असणार आहे. हे प्रेरणादायी आणि भव्य शिल्प 3 मजले इमारती एव्हढ्या आकाराच्या बेसमेंटवर उभारले जाणार आहे.या बेसमेंटच्या आता एक संग्रहालय व माहिती केंद्र उभारण्यात येणार आहे.तसेच 20 एकर जागेवर आकर्षक बगीचा करण्यात येणार आहे, सोबत आकर्षक प्रकाश योजना केली जाणार आहे त्यामुळे तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या सौंदर्यात आणखी वाढ होणार आहे.