धाराशिव (प्रतिनिधी)-  तुळजापूर विधानसभा मतदार संघात झालेल्या 6 हजार 95 बोगस मतदार अर्ज नोंदणी प्रकरणी धाराशिव जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी राज्य निवडणुक आयुक्ताकडे लेखी अहवाल सादर केला आहे. निवडणुक विभागाने सर्व प्रक्रिया वेळीच करत गुन्हा नोंद केला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ निलेश देशमुख हे तपास करीत असुन तपास सुरु आहे. त्यांच्याकडून अहवाल आला की कळवू असे राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे. 

बोगस अर्ज नोंदणी प्रकरणी जिल्हा निवडणुक विभागाकडे शिवसेनेचे तालुकाप्रमुख अमोल जाधव यांची तक्रार आल्यावर त्याची चौकशी केली. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बसे यांच्या आदेशाने चावडी वाचन करून बोगस अर्ज ऑनलाईन केल्याचे लक्षात आल्यावर ते अर्ज रिजेक्ट, नाकारण्यात आले. त्यानंतर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद बोळंगे यांनी पोलिसात गुन्हा नोंद केला. चावडी वाचन करून बोगस अर्ज नोंदणी केलेल्या 294 बूथ व त्यातील 6 हजार 95 नावाची यादी अहवालासोबत जोडली आहे. ही सगळी नावे, कागदपत्रे, पुरावे निवडणुक विभागाने पोलिसांना तपासासाठी दिली आहेत.

बोगस आधारकार्ड, मोबाईल नंबर आधारे 6 हजार पेक्षा अधिक नव मतदार नोंदणी अर्ज करण्यात आले. बोगस मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न निवडणुक आयोगाने मतदार याद्यांचे चावडी वाचन करून हाणून पाडला. खुद्द निवडणुक आयोगाने फसवणूक व तोतयेगिरी केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून 10 महिने उलटले तरी तपास न झाल्याने खासदार ओमराजे निंबाळकर यांनी काही प्रश्न उपस्थितीत केले आहे. ओमराजे यांनी केंद्रीय व राज्य निवडणुक आयोगाकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी आयोगाला लेखी अहवाल पाठवला आहे. तर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी देखील शनिवार दि. 23 ऑगस्ट रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या प्रकरणाची चौकशी व्हावी. याबाबत आपण पाठपुरावा करणार असल्याचेही सांगितले. 


 
Top