धाराशिव (प्रतिनिधी)-  नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी धाराशिव तालुक्यातील महाळंगी गावात अचानक गेलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.

आज दि.11 ऑगस्ट रोजी सकाळीच उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख हे महसूल व कृषी विभागाच्या काही कर्मचाऱ्यांना घेऊन महाळंगी गावात शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी दाखल झाले. मोजणीसाठी शेतकऱ्यांना एक दिवस अगोदर नोटीस दिली होती.

रविवार असतानाही शेतकऱ्यांना काल रात्री नोटीस देऊन आज अचानक अधिकारी मोजणीसाठी गेले. मात्र, याला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला. शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी ज्या हरकती दिल्या होत्या त्यावर कसलीही सुनावणी न घेता अचानक मोजणीसाठी का आलात? असा सवाल शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख यांना केला. यावर देशमुख यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली.

मात्र, काही शेतकऱ्यांनी जोरदार विरोध दर्शविला. महाळंगी गावातील 13 शेतकऱ्यांच्या शेतातून शक्तीपीठ महामार्ग जात आहे. यातील 9 शेतकऱ्यांनी प्रशासनाला मोजणीसाठी विरोध दर्शविला आहे. तर 4 शेतकऱ्यांचा मोजणीसाठी पाठिंबा असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मागील काही काळापासून शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी धाराशिव जिल्ह्यात मोठा विरोध झालेला आहे. धाराशिव जिल्ह्यातील 19 गावातून शक्तीपीठ महामार्ग जात आहे. यावर बाधित शेतकऱ्यांनी मागील वर्षी 450 हरकती नोंदविलेल्या आहेत.

या हरकतींवर कसलीच सुनावणी न घेता प्रशासनाचे अधिकारी थेट मोजणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतात अचानक जात आहेत. महाळंगी गावात देखील प्रशासनाने  अचानक जाऊन मोजणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. महाळंगी गावातील काही शेतकऱ्यांनी मोजणीसाठी सहकार्य करण्याची भूमिका घेतल्यामुळे तिथे मोजणी सुरू झाली आहे. राज्य सरकारने प्रत्येक जिल्हा प्रशासनाला 30 सप्टेंबरपूर्वी शक्तीपीठ महामार्गाची मोजणी प्रक्रिया पूर्ण करावी असे आदेश दिले आहेत.

मात्र, शेतकऱ्यांना विरोध वाढतच असल्यामुळे प्रशासनासमोर मोजणी कशी पूर्ण करावी असा प्रश्न पडला आहे. धाराशिव जिल्ह्यातील 19 पैकी एकाही गावात मोजणी प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. प्रशासन आता मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरसावले असून येत्या काळात प्रशासन आणि शेतकरी यांच्यात संघर्ष वाढणार आहे.


 
Top