धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील पळसप येथील सेवानिवृत्त शिक्षक द्विंगत मनोहर फुटाणे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांनी रक्षा विसर्जन न करता स्मृती वृक्ष लागवडीचा निर्णय घेतला. पारंपरिक विधीऐवजी पर्यावरणपूरक पद्धतीचा स्वीकार करत कुटुंबीयांनी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ झाडे लावली.
दिनांक 27 रोजी फुटाणे यांचे अंत्यसंस्कार पार पडले. त्यानंतर रक्षा विसर्जनाची पद्धत टाळण्यात आली. त्याऐवजी त्यांच्या मुलींनी स्वतःच्या हस्ते झाडांच्या मुळाशी रक्षा टाकून वृक्षारोपण केले.
पारंपरिक पद्धतीनुसार रक्षा नदीनाल्यात विसर्जित केली जाते. मात्र या प्रक्रियेमुळे पाण्याचे प्रदूषण वाढते आणि पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो. त्याऐवजी फुटाणे कुटुंबीयांनी रक्षा झाडांच्या मुळाशी टाकून स्मृती वृक्ष लागवडीचा मार्ग निवडला. या पद्धतीमुळे दिवंगतांच्या स्मृतीला श्रद्धांजली वाहण्यासोबतच पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागणार आहे.
फुटाणे सर आयुष्यभर शिक्षक म्हणून कार्यरत राहिले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी वेगळा मार्ग स्वीकारत स्मृतीवृक्ष लागवड केली. या उपक्रमामुळे त्यांच्या स्मृतीसोबतच पर्यावरणालाही हातभार लागणार आहे. या वृक्ष लागवडीच्या उपक्रमाबाबत गावकऱ्यांनीही उपस्थित राहून सहभाग नोंदवला. रक्षा विसर्जनाऐवजी वृक्ष लागवड हा पर्याय निवडल्याने गावातही याची चर्चा झाली.
स्मृती कायम स्मरणार्थ
फुटाणे कुटुंबीयांनी सांगितले की, "रक्षाविसर्जनाऐवजी वृक्ष लागवडीचा निर्णय घेतल्याने वडिलांची स्मृती कायम स्मरणार्थ राहील. या स्मृतीवृक्षामुळे पुढील पिढ्याऺनाही त्यांचे योगदान आठवत राहील."