कळंब (प्रतिनिधी)- कळंब रेल्वे कृती समितीची बैठक जेष्टांचा विरंगुळा येथे डॉ. रामकृष्ण लोंढे यांचे अध्यक्ष ते खाली पार पडली.
यावेळी कृती समिती तर्फे धाराशिव-बीड-छत्रपती संभाजी नगर रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण संदर्भात माहिती देण्यात आली. सदरील रेल्वे मार्गाचे प्राथमिक सर्वेक्षण धाराशिव-बीड-छत्रपती संभाजी नगर-कन्नड ते चाळीसगाव पर्यंत दि 18,19 व 20 जुलै 2025 रोजी पार पडले. हे काम हैदराबाद येथील आर व्ही इंजिनीरिंग कन्सलटंशी कंपनी मार्फत करण्यात आले. हवाई (ड्रोन व हेलीकॉप्टर) आणि जमिनीवरील सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून सर्वेक्षण अहवाल रेल्वे विभागाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. यामार्गावर कळंब- केज रेल्वे स्थानकासाठी बीडचे खासदार बजरंग सोनवणे व धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. बैठकीस ॲड मनोज्ञ चोंदे, माधवसिंह रजपूत, ढोकी रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष राहूल वाकुरे पाटील, कोळेकर, सुरेश टेकाळे, संतोष भोजने, प्रदीप पत्की, सुभाष पाटील, आश्रुबा नांगरे उपस्थित होते. प्रस्तावना माधवसिंह रजपूत यांनी केली. तर मनोज चोंदे यांनी आभार मानले.
ढोकी रेल्वे स्टेशनला सर्व गाड्यांना थांबा द्या
ढोकी रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस सहीत सर्व गाड्यांना थांबा देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. कारण ढोकी रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस/ मेल सहित सर्व गाड्यांना थांबा देण्यासाठी लागणा-या सर्व मुलभूत सुविधा उपलब्ध आहेत. जसे की रेल्वे प्लॅटफॉर्म, रेल्वेचे तीन ट्रॅक्स, तिकीट बुकिंग खिडकी, स्टेशन मास्तर सहीत ईतर सोळा कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. सध्या लातूर-मुंबई रेल्वे लाईन वर तब्बल 22 रेल्वे गाड्यांची ये-जा चालू असून भविष्यात त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु सद्या केवळ दोनच पॅसेंजर रेल्वे गाड्या थांबतात. एक म्हणजे निजामाबाद-पंढरपुर आणि दुसरी म्हणजे परळी-मीरज. या ठिकाणी सर्व गाड्यांना थांबा सुरू होऊ शकतो. मात्र त्यासाठी जनरेटा आवश्यक आहे.
