धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी दालनासमोर आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्ह्यातील सरकारी शाळांमधील भौतिक सुविधांच्या अभावाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत “झोपा काढा“ हे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले.
धाराशिव जिल्ह्यात शेती आतबट्ट्याची झालेली असून कोणताही मोठा उद्योग नाही. व्यवसायासाठी बाजारपेठ अनुकूल नसतानाही जिल्ह्यातील तरुण शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर राज्याबाहेर जाऊन रोजगार व व्यवसायात यश संपादन करत आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग फक्त शिक्षणातूनच सुकर होऊ शकतो, हे सर्वश्रुत असतानाही नगरपरिषद प्रशासन, जिल्हा प्रशासन व शासनाकडून सरकारी शाळांच्या मूलभूत गरजांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे.
आम आदमी पार्टी धाराशिवच्या शाळा पाहणीदरम्यान नगरपरिषद शाळांमध्ये स्वच्छ शौचालय, स्वच्छ पिण्याचे पाणी, परिसर स्वच्छता, खेळाचे मैदान, निर्धोक इमारती यांसारख्या किमान सोयींचा गंभीरपणे अभाव असल्याचे निदर्शनास आले. याविरोधात झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी आणि जनतेला शिक्षणाबाबत जागरूक करण्यासाठी शांततेत व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आले. त्यानंतर नगरपालिकेला निवेदन सादर करण्यात आले.
या आंदोलनावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष राहुल माकोडे, जिल्हा सचिव मेहबूब शेख, जिल्हा उपाध्यक्ष तानाजी पिंपळे, राजपाल देशमुख, श्रीकांत भुतेकर, संजय दनाने, मुक्तार शेख, बिलाल रजवी, अंकुश चौगुले, शहाजी पवार, उस्मान शेख, चांद शेख, गणेश काजळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.