तुळजापूर (प्रतिनिधी)- “सुधारणा करा, पण भक्तांच्या श्रद्धेला हात लावू नका, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला. मंगळवारी दि. 12 ऑगस्ट रोजी रात्री श्री तुळजाभवानी मंदिरातील जिर्णोद्धार कामांची पाहणी व दर्शनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
आव्हाड म्हणाले, “मंदिराची बांधणी इतकी मजबूत आहे की, कळसाचे वजन खालच्या भिंती सहज पेलतात. पण काही मंडळी मंदिराविषयी असणारी श्रद्धा उध्वस्त करण्याचे काम करत आहेत. तलवारीत दैवी शक्ती कुणीही आणू शकत नाही; ती अंधश्रद्धा आहे. पैशासाठी ही मंडळी देवही विकतील.”
आव्हाड यांनी आरोप केला की, “आर्किओलॉजिकल विभागाच्या कामांमध्ये पैशाचा गैरव्यवहार दिसतो. सुंदर बांधकाम अकुशल कारागिरांकडून केले जाते. जिर्णोद्धार भक्तांच्या पैशातून होतो, पण दर पाच वर्षांनी 200 कोटींचा ‘घरभरणी' कार्यक्रम होतो.” ते पुढे म्हणाले, “मी पुरोगामी आहे, पण नास्तिक नाही. मी हिंदू आहे, पण सनातनी नाही. मी तुळजापूरला अडीचशे वेळा आलो आहे.” यावेळी जीवन गोरे, संजय पाटील दुधगावकर, संजय निंबाळकर, धैर्यशील पाटील, अमर चोपदार आदी उपस्थित होते.