तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मंदिरात मंदीर बंद झाल्यानंतर गर्भगृहात अनाहूत उंदीरचा प्रवेश झाल्यामुळे भक्तांमध्ये खळबळ उडाली आहे. गुजरातमधील भावनगर येथील भाविक हितेष पटेल रात्री ऑनलाईन दर्शन घेत असताना, देवीच्या मुख्य चांदीच्या सिंहासनावर उंदीर वावरत असल्याचे त्यांना स्पष्ट दिसले. ही धक्कादायक दृश्ये पाहताच भाविकाने मंदिर प्रशासनाला तातडीने कळवले. कारण, गर्भगृहातील प्राचीन दागिन्यांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली होती. या प्रकरणी प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे.
प्रशासनाची तात्काळ कारवाई
तहसिलदार आणि प्रशासकीय व्यवस्थापक अरविंद बोळंगे यांनी सांगितले की, गर्भगृहातील उंदरांचे प्रवेशमार्ग जाळ्यांनी बंद करण्यात आले. उंदीर मारण्यासाठी औषधे टाकण्यात आली. पकडण्यासाठी पिंजरे ठेवले गेले. यापूर्वीही अशा घटना घडल्या असल्याने, आता प्रशासन अधिक सतर्क आहे.
उंदीर प्रकरणी संस्थानचे स्पष्टीकरण
सध्या पुरातत्व विभागामार्फत जीर्णोद्धार सुरू असून, गाभाऱ्यातील जुनी फरशी बदलण्याचे काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मंदिर बंद झाल्यानंतर सुमारे 1.45 वाजता सीसीटीव्हीत उंदीर दिसला. त्यानंतर तात्काळ गाभाऱ्यात प्रवेशबंदी करून लोखंडी जाळी बसवली असून, भाविकांच्या सुरक्षेसह देवीच्या मानमरातबाचा सन्मान राखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली आहेत. आगामी काळात अशा प्रकारची घटना होऊ नये म्हणून प्रशासनाने विशेष देखरेख ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.