धाराशिव (प्रतिनिधी)- कनगरा ( जि. धाराशिव) येथील गट क्र. 172 मधील सरकारी जागेवर झालेल्या अतिक्रमण प्रकरणात महसूल विभागाने तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. उपअधीक्षक भूमिअभिलेख धाराशिव दिलीप मोरे यांनी संबंधित प्रकरणी नोटीस बजावून व चौकशी आदेशित करून आवश्यक ती पावले उचलली आहेत.
सदर प्रकरणात गावातील मोहन बाबूसाहेब सुरवसे व इतरांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गट क्र. 172 मधील जमिनीवर नगर भूषण नंदू खोचे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बेकायदेशीररित्या बांधकाम व वापर सुरू केल्याची माहिती मिळाली. यासंदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्या बैठकीत तातडीने तपास व कारवाईसंदर्भात निर्णय घेण्यात आला.
महसूल विभागाने पंचनामे, जमीन नोंदी व चौकशी अहवालांच्या आधारे ही जागा सरकारी असल्याचे स्पष्ट केले असून, अतिक्रमण करणाऱ्यांना जागा रिकामी करण्याचा आदेश दिला आहे. तसेच, प्रकरणाची पूर्ण छाननी होईपर्यंत कोणत्याही प्रकारचे बांधकाम किंवा वापर थांबविण्यासही निर्देश देण्यात आले आहेत. तक्रारीत नमूद व्यक्तींनी 9 ऑगस्ट 2025 रोजीही संबंधित जागेवर बेकायदेशीर हालचाली सुरू ठेवल्याने, महसूल अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने पुढील कार्यवाहीसाठी संयुक्त पथक तयार करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत पोलीस ठाण्याचे निरीक्षक व संबंधित विभागीय अधिकारी यांना समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही कारवाई महसूल, पोलिस व ग्रामपंचायत प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नाने करण्यात येणार असून, सरकारी जमिनीवरील अतिक्रमण रोखण्यासाठी ही मोहीम कायम ठेवली जाणार आहे, असे उपअधीक्षक भूमिअभिलेख दिलीप मोरे यांनी स्पष्ट केले.