तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठा आरक्षणासाठी तुळजापूर तालुक्यातील मराठे आता सणवार, पावसाचा अडथळा, घरची जबाबदारी सगळं बाजूला ठेवून हजारो वाहनांतून मुंबईकडे रवाना झाले आहेत.
“घरात बसला, तो मराठा कसला...” या घोषणेमुळे गावोगाव एक वेगळीच चळवळ उभी राहिली आहे. आजी-आजोबा, आई-बहीणी यांच्या डोळ्यातून अश्रू, पण मनात मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा विश्वास हे चित्र प्रत्येक घराघरातून उमटत आहे. धोधो पावसात फक्त प्लास्टिकचा आसरा, वाहनांतून निवारा, तरीही शेकडो किमीचा हालहापेष्टा सहन प्रवास यामुळेच हे आंदोलन चुलीपर्यंत पोहोचले आहे. याचा प्रत्यय देत आहे.
जीप, आयशर टँम्पो, ट्रॅक्टर, टेम्पो, टमटम, रिक्षा, पाण्याचे टँकर, शिधा, गॅस सिलेंडर, भाजीपाला घेऊन गावोगावून आलेली मराठे थेट मुंबईच्या आझाद मैदानाकडे जात आहेत. तुळजापूरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करूनच या मराठा फौजेने आपली कुच केली आहे. मुंबईतील मराठा पाव्हणे आपल्या गावाकडच्या मराठ्यांची सरबराई करण्यात कसलीही कुचराई करत नाहीत. स्नान, चहापाणी करून पुन्हा झुंडी आझाद मैदानाकडे निघत आहेत. सध्या मराठा आरक्षण आंदोलनात वरिष्ठ नेता आपआपल्या गावात असले तरी महायुती, महाविकास आघाडीचे मराठा समाजातील कार्यकर्ते माञ ऐकञितपणे राजकिय मतभेद सोडुन मुंबईत मराठा आरक्षणासाठी दाखल होत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्यावरचा मराठा समाजाचा विश्वास एवढा प्रबळ आहे की, हे आंदोलन आता फक्त मोर्चा राहिलेले नाही तर मराठा एकसंघाचा ज्वालामुखी बनले आहे. तुळजापूरपासून मुंबईपर्यंतचा हा प्रवास म्हणजे आरक्षण फक्त आंदोलन नाही तर मराठा समाजाच्या ऐक्याचा इतिहास घडवणारी यात्रा आहे.

