भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यात मटका-जुगार व्यवसायावर अलीकडेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाने मोठी धडक कारवाई केली. विविध ठिकाणी छापे टाकून अनेक आरोपींवर गुन्हे दाखल झाले. या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असले तरी एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय “मटक्यावर धाडी शक्य आहेत, मग गुटखा माफियांवर व धाब्यावर विकली जाणारी अवैध दारुवर कारवाई का नाही?“ असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.
शहर व ग्रामीण भागात गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री सुरु आहे. शाळा-महाविद्यालय परिसरातही हे घातक पदार्थ सहज मिळत असून लहान मुले व तरुणाई व्यसनाधीनतेच्या विळख्यात सापडत असल्याची भीती पालकांत वाढली आहे. आरोग्यास अपायकारक गुटख्यावर शासनाने बंदी घातली असली तरी भूम तालुक्यात हा धोकादायक धंदा बिनधास्त सुरू आहे. त्याचबरोबर वाळू माफियांचा यावरही कारवाईचा अभाव जाणवतो. यामागे पोलिस प्रशासनातील शिथिलता दिसत आहे.
उपविभागीय पथक मटक्यावर धाड्या टाकताना दिसते. मात्र भूम पोलीस स्टेशनला खुलेआम सुरु असलेला गुटखा व अवैध धंदा दिसत नाही, अशी नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे. गुटका विक्री संदर्भात शहरातील युवक सोनम बनसोडे यानी लेखी तक्रार जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे करूनही मात्र त्यावर कार्यवाही झाली नाही.