धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील टाकळी (बें) या छोट्याशा गावातील प्रताप काकासाहेब सोनटक्के या मेहनती विद्यार्थ्याने हिंगोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून गावासह संपूर्ण परिसराचा अभिमान वाढवला आहे. 2025 च्या NEET परीक्षेत त्याने 506 गुण मिळवत ऑल इंडिया रँक 45,637 मिळवली. महाराष्ट्र शासनाच्या CET सेलमार्फत प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन प्रतापने हिंगोली सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात पाऊल ठेवले आहे.

घरची अत्यंत बेताची, हालाखीची परिस्थिती असताना हा विजय प्रतापने जिद्द, नियोजन, सातत्य आणि अथक कष्टांच्या जोरावर मिळवला. प्रवेश प्रक्रियेपूर्वीच प्रतापच्या वडिलांचे, काकासाहेब सोनटक्के यांचे, हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले—ही घटना संपूर्ण कुटुंबाला हादरवून गेली. अशा वेळीही धैर्य न सोडता, डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रतापने संघर्ष सुरू ठेवला.

या प्रवासात श्री साई श्रद्धा एज्युकेशनचे संचालक प्रा. सोमनाथ लांडगे यांचे मोलाचे मार्गदर्शन प्रतापला लाभले. केवळ अभ्यासातील मार्गदर्शनच नव्हे तर पूर्ण प्रवेश प्रक्रिया सुद्धा त्यांच्या सल्ल्याने पार पडली. प्रतापच्या या यशानंतर श्री साई श्रद्धा एज्युकेशनच्या कार्यालयात त्याचा प्रा. सोमनाथ लांडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी संचालक प्रा. नागेश गोटे, चुलते अॅड. गहिनीनाथ सोनटक्के, सौ. उषाताई लांडगे, डॉ. ऋषिकेश लांडगे उपस्थित होते. प्रतापच्या या कामगिरीने टाकळी (बें) गावासह परिसरातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी उदाहरण मिळाले आहे.

 
Top