धाराशिव (प्रतिनिधी)- ईद-ए-मिलादुन्नबी अर्थात इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची जयंती आणि गणरायाची विसर्जन मिरवणूक एकाच दिवशी 5 सप्टेंबर रोजी येत असल्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर तिसऱ्या दिवशी 8 सप्टेंबर रोजी जुलूस काढण्याचा निर्णय  ईद-ए-मिलादुन्नबी कमिटीने घेतला आहे. धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ति किरण पुजार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती शफाकत आमना यांच्या विनंतीनंतर हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाने धाराशिवकरानी पुन्हा एकदा देशाला धार्मिक सौहार्दाचे दर्शन घडविले आहे. 

ईद-ए-मिलादुन्नबी कमिटीने प्रशासनाला कळविलेल्या माहितीनुसार, 5 सप्टेंबर रोजी पैंगंबर जयंतीचे सर्व धार्मिक कार्यक्रम पूर्वनियोजित प्रमाणेच होतील. मिरवणूक मात्र 8 सप्टेंबर रोजी काढण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शहरात ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त 12 दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. जयंती निमित्त अरब मस्जिद ते दर्गा अशी पारंपरिक मिरवणूक देखील काढली जाते. परंतु गणेश विसर्जन मिरवणूक आणि पैगंबर जयंती मिरवणूक एकाच दिवशी 5 सप्टेंबर रोजी येत असल्यामुळे ईद-ए-मिलादुन्नबी कमिटीने मिरवणुकीच्या तारखेत बदल करून 8 सप्टेंबर रोजी मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेन्द्र मिश्र यांनी देखील कौतुक केले असून पोलीस प्रशासन व कमिटी यांच्यातील समन्वयाबद्दल समाधान व्यक्त केले.

यावेळी ईद-ए-मिलादुन्नबी कमिटीचे अध्यक्ष इर्शाद सय्यद, कार्याध्यक्ष अजहर पठाण, मसूद शेख, वाजीद पठाण, बाबा मुजावर, इस्माईल शेख, मैनोद्दीन पठाण, धनंजय शिंगाडे, अमोल सुरवसे, समी मशायक, खलील पठाण उपस्थित होते.

 
Top