धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून हिवताप,डेंगू व चिकुनगुनिया रुग्णसंख्येत वाढ झालेली आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी आरोग्य विभागाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून, नागरिकांनी स्वतःची आणि परिसराची स्वच्छता राखून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात,असे आवाहन केले आहे.
प्रत्येक पंधरवड्याला आरोग्य कर्मचाऱ्यांकडून कीटकशास्त्रीय व जलदताप सर्वेक्षण केले जाते.ताप आढळलेल्या व्यक्तींचे रक्तनमुने तपासले जात असून निदान झालेल्या रुग्णांवर तात्काळ उपचार केले जातात.असे डॉ. हरिदास यांनी सांगितले.
हे आजार दूषित डासांच्या मादीपासून पसरतात.याची लक्षणे मुख्यतःतीव्र ताप,डोके व डोळ्यांत दुखणे,अंगदुखी, थंडी वाजून ताप येणे, सांधेदुखी, अंगावर लाल पुरळ, मळमळ व उलट्या इत्यादी. अशी लक्षणे दिसताच नागरिकांनी तातडीने जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.एम.आर.कोरे यांनी सांगितले. आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक गावात डास अळी सर्वेक्षण. टेमिफोस (अबेट) औषधाचा वापर.डास उत्पत्ती स्थळांवर गप्पी मासे सोडणे आदि उपाययोजना करण्यात येत आहे.
नागरिकांनी काळजी घ्यावयाची असून आठवड्यातून एक दिवस “कोरडा दिवस” पाळावा.घराशेजारी साचलेले पाणी लगेच वाहते करून द्यावे.आरोग्य विभागाच्या फवारणी पथकास सहकार्य करावे.रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा व पूर्ण कपडे घालावेत.संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत दारे-खिडक्या बंद ठेवाव्यात. छतावरील टाकाऊ भांडी,टायर्स, मडकी यांची विल्हेवाट लावावी.गटार-नाल्यात रॉकेल किंवा टाकाऊ ऑईल टाकावे. नागरिकांनी या उपाययोजना काटेकोरपणे पाळाव्यात,असे आवाहन जिल्हा परिषद, धाराशिवच्या वतीने करण्यात आले आहे.