धाराशिव (प्रतिनिधी)-  तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या विकास आराखड्याबाबत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा अर्धवट व्हिडिओ दाखवून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा व खोटारडेपणाचा प्रयत्न  जिल्ह्याचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार व आमदार करत असल्याचा आरोप भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे व जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी केला. खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या पत्रकार परिषदेस प्रत्युत्तर म्हणून प्रतिष्ठान भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

यावेळी पुढे बोलताना  भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे व जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी सांगितले की, ठाकरे गटाचे खासदार व आमदार हे आमदार राणादादांचा अर्धवट व्हिडिओ दाखवून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करीत आहेत. तीर्थक्षेत्र तुळजापूर विकास आराखड्यासाठी यांचे महाविकास आघाडीचे सरकार असताना एक रुपया देखील या दोघांनी आणला नाही. याउलट केंद्रीय मंत्री “ प्रसाद योजनेच्या “ माध्यमातून तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या  विकासासाठी निधी तयार तयार असताना देखील त्या वेळचे सांस्कृतिक कार्यमंत्री आदित्य ठाकरे यांनी साधा प्रस्ताव देखील केंद्र सरकारकडे पाठविला नाही व त्यासाठी या खासदार व आमदार यांनी प्रयत्न केले नाहीत. तुळजापूरच्या विकासामध्ये यांचे कोणतेही योगदान नसताना व आमदार राणाजगजीतसिंह पाटील हे या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असताना त्यांचा अर्धवट व्हिडिओ दाखवून ठाकरे गटाचे हे दोन्ही नेते खोटे आरोप करीत आहेत. या तुळजापूर विकास आराखड्या अंतर्गत होणारी मंदिरातील विकास कामे हे पुरातत्व विभागाच्या अहवालानुसार व सूचनेनुसार होत असताना जनतेच्या मनामध्ये हे दोन्ही नेते संभ्रम निर्माण करत आहेत असा आरोप नितीन काळे व दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी केला.  यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अँड. नितीन भोसले, तुळजापूर शहर मंडल तालुकाध्यक्ष आनंद कंदले, अमित शिंदे, शांताराम पेंदे आदी या पत्रकार परिषदेत उपस्थित होते.


 
Top