भूम (प्रतिनिधी)- मौजे घाटपिंपरी येथे 15 व 16 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम शमा पवार (अतिरिक्त जिल्हाधिकारी, रस्ते विकास महामंडळ, मुंबई व पर्यटन विभाग प्रमुख पुणे) आणि सुशीलकुमार पवार (संचालक, सिद्धी एंटरप्रायझेस पुणे) यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला.
15 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ध्वजारोहणानंतर स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. विशेषतः स्वातंत्र्यसैनिक कै. निवृत्ती माणिकराव गोडसे यांच्या स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक, स्मृतिचिन्ह आणि स्थानिक प्रजातीचे रोपटे देऊन गौरविण्यात आले. 16 ऑगस्ट रोजी ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र' या संकल्पनेतून जिल्हा परिषद शाळा व न्यू हायस्कूल घाटपिंपरीत वृक्षारोपणाचा भव्य कार्यक्रम घेण्यात आला. शाळेचे माजी व आजी विद्यार्थी यांच्या हस्ते आंबा, पेरू, चिंच, आवळा, करंज, सीताफळ अशा स्थानिक प्रजातींची लागवड करण्यात आली. विद्यार्थ्यांनी रोपांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली. या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सर्वांनी शेताच्या बांधावर किमान पाच झाडे लावण्याचा संकल्प व्यक्त केला. या उपक्रमांमुळे शिक्षणाबरोबरच पर्यावरण संवर्धनाच्या जाणीवेलाही चालना मिळाली.