धाराशिव (प्रतिनिधी) - जिल्ह्याचे मागासलेपण ओळखून केंद्र सरकारने जिल्ह्याचा समावेश आकांक्षित जिल्ह्यात केला आहे.केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची स्क्षुम नियोजनातून आणि प्रभावी अंमलबजावणी करुन आकांक्षित जिल्हा म्हणून लागलेला शिक्का मिटवण्यासाठी सर्वजण एकत्र येऊया, असे आवाहन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्य दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले. ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी स्वातंत्र्यसैनिक भास्करराव नायगावकर, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, मित्राचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास घाडगे,माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, पोलिस अधिक्षक शफकत आमना, अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, जि.प.अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अुनप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, उपजिल्हाधिकारी सर्वश्री शिरीष यादव, प्रविण धरमकर, संतोष राऊत, अरुणा गायकवाड,जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता विजय थोरात, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शैलेश चौहान,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, सामाजिक वनीकरणचे विभागीय वनाधिकारी विश्वास करे, जि.प.चे मुख्य वित्त व लेखा अधिकारी सचिन इगे,राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना सरनाईक म्हणाले की, जिल्ह्याचे वनक्षेत्र हे १ टक्क्यापेक्षाही कमी आहे.जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी जिल्ह्याचे वनक्षेत्र वाढले पाहिजे यासाठी पुढाकार घेतला आणि हरित धाराशिव अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात एकाच दिवशी १९ जुलैला १५ लक्ष वृक्षलागवडीचा संकल्प करुन तो प्रत्यक्षात देखील आणला. त्याची दखल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड,एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांनी घेतली. या वृक्षलागवड मोहिमेत नागरिकांचा उत्स्फूर्त होता.एक नवा विक्रम जिल्ह्याने या मोहिमेत नोंदविला आहे. या विक्रमाबद्दल पालकमंत्री यांनी धाराशिवकरांचे अभिनंदन केले. तसेच चालू वर्षामध्ये जिल्ह्यातील ३४१ शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आल्याचे सांगून ते म्हणाले की, या शेतरस्त्यांचा जवळपास ६ हजार ५०० शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. जिल्हयातील ३ लक्ष ४६ हजार ६७८ शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकची नोंदणी केली आहे.ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही नोंदणी केली नाही,त्या सर्व शेतकरी बांधवांनी नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच एप्रिल व मे २०२५ मध्ये आलेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे बाधित ११ हजार २८० शेतकऱ्यांना ९ कोटी रुपये निधी मंजूर केला असून बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे. ऑक्टोबर २०२४ च्या नैसर्गिक आपत्तीचे ८६ कोटी रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.