तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील आपसिंगा गावचे सरपंच अजित क्षीरसागर आणि अनेक आजी-माजी ग्रामपंचायत सदस्यांनी तालुका प्रमुख अमोल जाधव यांच्या हस्ते थेट शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) जाहीर प्रवेश करत गावोगावचा राजकीय पट रंगतदार केला.
या प्रवेश सोहळ्यात ग्रामपंचायत सदस्य सुजित सोनवणे, सचिन रोंगे, पांडुरंग दिलपाक, आबा गुरव, सुरेश सुरडकर, वडगाव (देव) चे कपिल देवकते, वाणेगावचे सरपंच संभाजी कोरे पाटील, माजी सरपंच मोहन ढेकले, माजी उपसरपंच अप्पासाहेब पाटील यांच्यासह अनेक जण भगव्या झेंड्याखाली आले.
तालुका प्रमुख अमोल जाधव यांनी ‘ही फक्त ट्रेलर आहे, पिक्चर बाकी आहे' या अंदाजात इशारा देत सांगितले की, “लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, माजी नगरसेवक मोठ्या संख्येने पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जाहीर प्रवेश करतील.“ या सोहळ्यात शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख गणेश नेते, शहर उपप्रमुख रमेश चिवचिवे, युवा नेते शहाजी हाक्के, भुजंग मुकेरकर, रितेश जावळेकर, नितीन मस्के, स्वप्निल सुरवसे यांच्यासह असंख्य शिवसैनिकांची उत्साही गर्दी होती.
आता तालुक्यात भाजपची पकड सैल करण्यासाठी शिवसेनेची ही सलग मोहीम किती दमदार ठरते आणि पुढे कोण कोण ‘शिवसेनेच्या गळ्यात पडते' याकडे राजकीय वर्तुळात उत्सुकतेने नजर लागली आहे.