भूम (प्रतिनिधी)- कल्याण नगर पारधी वस्ती येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात व ऐक्यभावनेने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रमणी गायकवाड यांनी प्रभावीपणे केले. प्रारंभी डॉ. पोतरे आणि प्राथमिक शिक्षक श्री. माधव पोतरे यांनी प्रास्ताविक मांडले. त्यानंतर आदिवासी समाजासाठी कार्य करणारे आणि पारधी समाजाचे अभ्यासक प्रा. हारी महामुनी यांनी समाजाच्या इतिहास, संस्कृती व सध्याच्या गरजांवर प्रकाश टाकत मार्गदर्शन केले.
यावेळी सुनील काळे यांनी पारधी समाजाचा वारसा, इतिहास आणि विद्यमान परिस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्यक्षात समाजापर्यंत कसा पोहोचेल यासाठी बांधवांना जागृत केले.
पोलीस निरीक्षक, भूम कानगुडे, वैद्यकीय अधिकारी चकणे, गुरुपीठ सामनगाव हभप. धनंजय सामनगावकर, आदिवासी पारधी महासंघ प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश सुनील कांबळे, हभप. अरुण शंकर महाराज, आदिवासी पारधी जिल्हाध्यक्ष, धाराशिव नाना पवार, हभप. सोमनाथ बाबर महाराज, प्रभाकर वाकलिंगकर आणि व्यापारी मंडळ अध्यक्ष दिलीप गायकवाड महाराज उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी दत्ता पवार यांनी आभार मानले. या सोहळ्यातून आदिवासी समाजात एकतेचा, संस्कृती जतनाचा आणि हक्कांसाठी सजगतेचा संदेश देण्यात आला.