भूम (प्रतिनिधी)- मागील तीन ते चार दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने भूम तालुक्यातील तीन मध्यम प्रकल्पासह साठवण तलाव, पाझर तलाव शंभर टक्के भरले असून तालुक्यातील चार मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे.

तालुक्यातील बाणगंगा, रामगंगा, संगमेश्वर यातील मध्यम प्रकल्पासह सर्वात मोठा आरसोली लघु प्रकल्प व तालुक्यातील सर्व साठवण तलाव शंभर टक्के औसांडून वाहत आहेत. तर तालुक्यातील चार मंडळात जून ते ऑगस्ट दरम्यान 580. 6 मिमी सरासरी पर्जन्यमान झाले आहे. तर 15 ऑगस्ट अखेर 386.02 मिमी पर्जन्यमान झाले आहे. भूम (76.75), आंबी (86.25), वालवड (86.15), ईट (77.75) मंडळात अतिवृष्टी झाली आहे. या चारही मंडळात सोयाबीन,उडीद, मुग,मका आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी नदीच्या कडेला असणाऱ्या शेतकऱ्यांचे शेतीचे फार मोठे नुकसान झाले आहे. तर तालुक्यातील हाडोग्री, चिंचोली, रामेश्वर, ईडा, अंतरगाव, रामकुंड, आष्टा, सोनगिरी, सुकटा, ईराचीवाडी या गावांमध्ये मिळून 16 ठिकाणी घरांची पडझड झाली आहे.

 
Top