धाराशिव (प्रतिनिधी)- स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गुरुवर्य के टी पाटील फाउंडेशन वर्ग, श्रीपतराव भोसले माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय येथे आंतर शालेय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन प्रशालेचे मुख्याध्यापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष नन्नवरे एन. आर. यांच्या हस्ते पार पडले. 

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सेवानिवृत्त जि.प. शिक्षक शिवकुमार लगाडे हे होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुवर्य के टी पाटील फाउंडेशन वर्ग प्रमुख डॉ. विनोद आंबेवाडीकर  यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयमाला शिंदे  व श्रीमती गायकवाड विद्या यांनी केले. सदर स्पर्धेसाठी धाराशिव शहरातील अनेक शाळांनी सहभाग घेतला. सदर स्पर्धेचे परीक्षण डॉ. वैशाली बोबडे (रामकृष्ण परमहंस महाविद्यालय) व मनोज डोलारे (श्रीपतराव भोसले जुनिअर कॉलेज) यांनी केले. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील अनेक घटना तसेच अनेक क्रांतिकारकांचे जीवनपट स्पर्धेच्या माध्यमातून मांडले. काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या संकल्पनेतील भारत कसा असावा याबद्दल विस्तृत वक्तृत्व केले.

 सदर स्पर्धेत श्रीपतराव भोसले माध्यमिक विद्यालयातील इयत्ता सातवी वर्गातील सृष्टी बाळकृष्ण उंबरे हिने प्रथम क्रमांक पटकावला. तर छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थिनी अनुजा भगवान जाधव हीने द्वितीय क्रमांक पटकावला. तृतीय क्रमांक गुरुवर्य के टी पाटील फाउंडेशन वर्गातील विद्यार्थिनी सृष्टी साहेबराव जगदाळे हिने संपादन केला. तर उत्तेजनार्थ विद्यार्थी समर्थ सतीश कुठाळ राहिला. सदर विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते रोख पारितोषिक, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कारित करण्यात आले. अध्यक्षीय भाषणामध्ये प्रशालेचे मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे यांनी आधुनिक विकासाची घडी बसवण्यासाठी विद्यार्थ्यांनी इतिहास विसरून चालणार नाही. क्रांतीकारकांच्या जीवनातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी असे म्हटले. प्रमुख अतिथी शिवकुमार लगाडे यांनी विविध गोष्टींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वक्तृत्व कला कशा पद्धतीने पारंगत करावी यासंदर्भात मार्गदर्शन केले. सदर स्पर्धेकरिता एस. बी. चव्हाण, बी.डी.पाचकुडवे, समाधान शेटे, अमित काकडे, के.ए.यादव, कुंभार, नाईकवाडी, भोसले व क्रीडा शिक्षक धीरज लोमटे यांनी परिश्रम घेतले.

 
Top