धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) ने कंबर कसली आहे. निवडणुकीची रणनीती आखण्याबाबत शासकीय विश्रागृहात झालेल्या बैठकीत प्रमुख पदाधिकाऱ्याची मते जाणून घेण्यात आली. 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वाधिक काळ वर्चस्व असलेल्या धाराशिव नगर परिषदेवर पुन्हा पक्षाचा झेंडा फडकविण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तसेच पक्षाअंतर्गत सर्व सेलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी निवडणुकीच्या अनुषंगाने आपली भूमिका मांडली. ही निवडणूक संपूर्ण ताकदीने लढविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी धाराशिव शहर व जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी उपलब्ध करून दिलेला भरघोस निधी आणि त्यातून झालेली विकासकामे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन बैठकीत करण्यात आले.  बैठकीस पक्षाचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 


खासदार, आमदार, नगराध्यक्षांमुळे शहर भकास - तावडे

धाराशिव शहरातील विविध विकास कामांसाठी महायुती सरकारने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. परंतु ठाकरे सेनेचे स्थानिक खासदार, आमदार व जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांच्या मनमानी कारभारामुळे निधीचा योग्य विनियोग झाला नाही. रस्ते, नाल्यांची कामे न झाल्याने शहर भकास झाले. याचा परिणाम जनतेच्या समस्या अधिक वाढल्या आहेत. आता हेच लोक प्रशासनावर जबाबदारी ढकलून हात झटकत आहेत. आणि स्वतःच आंदोलनाची नौटंकी करून जनतेची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता नगर परिषदेवर आणण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सचिन तावडे यांनी सांगितले.


 
Top