धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील 25 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि तेरणा व रुईभर धरणातून शहराच्या वाढीव पाणीपुरवठ्यासाठी आपल्या महायुती सरकारने विशेष बाब म्हणून 330 कोटी रुपयांचा ऐतिहासिक निधी उपलब्ध करुन दिला आहे. लवकरच शहरातील रस्ते आणि पाणीपुरवठ्याच्या कामाचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवार 8 ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे, भाजपा नेते नितीन काळे उपस्थित होते. पुढे बोलताना पाटील म्हणाले की,महायुती सरकारच्या माध्यमातून आपण केलेल्या पाठपुराव्याला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सातत्याने बळ दिले. आपल्या धारशिव शहरासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून विशेष बाब म्हणून मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
नगर विकास खात्याच्या माध्यमातून नगरोत्थान योजनेंतर्गत शहरातील 25 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची सुधारणा करण्याच्या कामांसह अमृत 2.0 अंतर्गत तेरणा व रुईभर धरणातून करण्यात येत असलेल्या वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी तब्बल 330 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या कामांचे भूमिपूजन करण्यासाठी त्यांना विनंती केली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिपूजन करण्यासाठी येण्यास अनुमती दिली असून लवकरच मान्यवरांच्या हस्ते शहरातील रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
शहराची वाढती गरज लक्षात घेऊन अमृत 2.0 अभियानांतर्गत तेरणा व रुईभर धरणातून धाराशिव शहरासाठी रुपये 180 कोटी अंदाजपत्रकीय किमतीची नवीन पाणी पुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. या महत्वपूर्ण योजनेअंतर्गत दोन्ही धरणामध्ये जॅकवेल, पंप घर, धरण ते धाराशिव शहरापर्यंत 30 किमी अंतराची पाईप लाईन, जल शुद्धीकरण केंद्र, पाण्याची टाकी, शहरांतर्गत 223 किमी लांबीची पाईप लाईन आणि तब्बल 12000 कुटुंबांना मोफत नळ जोडणी इत्यादी कामांचा समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेद्वारे तेरणा धरणातून 18 एमएलडी व रुईभर धरणातून 8 एमएलडी पाणी धाराशिव शहरात आणण्यात येणार आले. यासाठी आपण केलेल्या प्रयत्नाला आता यश मिळाले आहे. या कामाचेही भूमिपूजन करण्यात येणार आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात धाराशिव शहरातील रस्त्यांच्या कामासाठी एक दामही निधी मिळाला नाही. त्यामुळेच आज शहराची अशी दुरावस्था झाली आहे. रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था केवळ महाविकास आघाडीच्या अनास्थेमुळे झाली. महायुती सरकारच्या माध्यमातून शहरातील 25 किलोमीटर लांबीच्या सिमेंट रस्त्यांसाठी 154 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास मंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष बाब म्हणून धाराशिव शहरासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. शहरातील रस्त्यांसाठी एवढा ऐतिहासिक निधी यापूर्वी कधीही मिळाला नव्हता. या निधीच्या माध्यमातून शहरातील सिमेंट रस्ते आणि नाल्यांचे बांधकाम वेगात केले जाणार आहे.
आपल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे देवेंद्रजी फडणवीस यांच्या विशेष सहकार्यातून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 154 कोटी रूपयांच्या या विशेष प्रस्तावाला मंजुरी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांचे धाराशिव शहरवासियांच्या वतीने आपण मनःपूर्वक धन्यवाद मानत असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.