वाशी (प्रतिनिधी)- गोहत्या बंदी सुधारित कायदा 2015 रद्द करण्याची मागणी करत वाशी तालुक्यातील शेतकरी, पशुपालक, वाहतूकदार व अल्पसंख्याक समाजबांधवांनी तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन दिले. दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी तहसील कार्यालय, वाशी येथे सदर निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद केले आहे की, 2015 मध्ये लागू करण्यात आलेल्या गोहत्या बंदी सुधारित कायद्यामुळे शेतकऱ्यांना, दुग्ध व्यवसायिकांना व पशुव्यवसायाशी संबंधित नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. गोवंशीय प्राणी जसे की म्हशी, बैल, व दुभती जनावरे विकण्यास व खरेदी करण्यास मर्यादा येत असून, त्यामुळे शेतीसाठी आवश्यक जनावरांची खरेदी करणे अवघड झाले आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जुनी जनावरे विकून नव्या दुभत्या गायी व बैल खरेदी करण्याची पारंपरिक व्यवस्था या कायद्यामुळे विस्कळीत झाली आहे. यामुळे शेती व दुग्ध व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होत आहे.

तसेच, शेतकऱ्यांनी दुभती जनावरे किंवा बैल शेतीच्या कामासाठी वाहतूक करताना तथाकथित गौरक्षक किंवा पोलिसांकडून अडवणूक होऊन जनावरे गोशाळेत जमा केली जात असल्याचा आरोपही निवेदनात केला आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली असून, गोवंश हत्या प्रतिबंधक सुधारणा कायदा 2015 तातडीने रद्द करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. सदर निवेदनावर विठ्ठल दगडू कोकाटे, देवदत्त पवार, रमेश महादेव साळुंखे, महादेव गायकवाड, सिद्धेश्वर गाडेकर, भगवान लगडे यांच्यासह अनेक नागरिकांच्या सह्या आहेत.

 
Top