भूम (प्रतिनिधी)-  भूम शहरात धक्कादायक प्रकार घडला असून, शुभम संजय भोसले (वय 23, रा. कसबा) या तरुणाने हातात लोखंडी तलवार घेऊन थेट पोलीस ठाण्यात घुसून दहशतीचे वातावरण निर्माण केले. “पोलीस हरामखोर आहेत” असे म्हणत शिवीगाळ करत त्याने एका अंमलदारावर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अंमलदाराने प्रसंगावधान राखून वार चुकवला; मात्र त्यांच्यासोबत असलेल्या दत्ता शिंदे यांना तलवारीचा फटका बसून जखमी झाले.

आरोपीने पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये घुसून टेबलावरच्या काचेला तलवारीने फोडत अंदाजे 10,000 रुपयांचे शासकीय नुकसान केले. तसेच हेडकॉन्स्टेबल कवडे आणि शिंदे यांना देखील तलवारीने मारण्याचा प्रयत्न केला व ढकलून दिले.

ही संपूर्ण घटना शासकीय कामात अडथळा निर्माण करणारी असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या 37(1)(3) आदेशाचे उल्लंघन करण्यात आले आहे. शुभम भोसले याच्यावर  कलम 109 (1) 132,118(1) 324(4), 125,352, 351 (3) कलम 4/25 भारतीय हत्यार कायदा, कलम 135 म. पो. का. सह कलम 7 फौजदारी दुरुस्ती कायदा सन 1932 प्रमाणे गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सपोनी बंदखडके हे पोलीस निरीक्षक कानगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. 14 दिवसाची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.


 
Top