तुळजापूर (प्रतिनिधी)-  यावर्षी अतिवृष्टी झाल्याने अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली असल्याने आधीच बळिराजा चिंतेत असताना तरी देखील पोळा सणासाठी खरेदी करताना शेतकऱ्यांमध्ये उत्साह जाणवत होता. काळ्या आईची इमाने इतबारे सेवा करणाऱ्या बैलांना सजवण्यासाठी शेतकरी आपापल्या आर्थिक कुवतीप्रमाणे साहित्य खरेदी करताना दिसून आले.

बैल पोळ्याच्या सणानिमित्त येथील मंगळवारचा आठवडी बाजार बैलांच्या सजावटीच्या साहित्याने सजला आहे. सध्या पोळ्याच्या निमित्ताने बाजारात विविध प्रकारचे रंगीबेरंगी सजावटीचे साहित्य विक्रीसाठी आले होते. साहित्यात वेसण, दोर, माळ, चौरंग, बेडगी, रंग, गुलाल, मठाठी, मोरकीचा आदींचा समावेश होता. वर्षभर शेतात शेतकऱ्यांसोबत राबलेल्या बैलांच्या प्रति कृतज्ञता भावना म्हणून बैलपोळा साजरा केला जातो. यंदा बैलपोळा सण शुक्रवार असुन खांदमळणी गुरुवारी असल्याने गुरुवार पासुन शेतकरी बैलपोळा सण साजरा करण्यास आरंभ झाला आहे. बैलपोळा सणानिमित्त बैलाला रंगरंगोटी व सजावट करून त्यांची पारंपारिक वाद्यसह वाजत गाजत गावातून मिरवणूक काढली जाते. तसेच गावातील ग्रामदेवता म्हणून हनुमंतरायाचे व गोमाता मंदिरात जाऊन राधा कृष्णाचे दर्शन घडविले जाते. बैलाची पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खायला घालण्याची संस्कृती आहे.

 
Top