तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने नव्याने करण्यात आलेल्या रस्त्यांची अवस्था निकृष्ट दर्जामुळे काही दिवसांतच बिकट झाली असून, याचा फटका सरळ ग्रामस्थ व भाविकांना बसत आहे.
कामे नियमाप्रमाणे न झाल्याने अनेक रस्त्यांची वाट लागली आहे. तरीही संबंधित प्रमुख अधिकारी ठेकेदारांना फक्त नोटीस देऊन नामानिराळे राहत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. स्थानिकांचा ठाम आरोप आहे की, “या प्रकरणी प्रथम अधिकारी जबाबदार असून त्यांच्या दुर्लक्षितपणामुळेच रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे प्रथम अधिकाऱ्यांवरच कारवाई व्हावी” अशी मागणी होत आहे. तालुक्यातील वडगाव-लाख ते जवळगा, सारोळा ते मंगरुळ, काक्रंबा ते जवळगा, हायवे सांगवी ते मसला, मंगरुळ-तुळजापूर-आपसिंगा, हंगरगा पाटी ते मंगरुळ आदी अनेक रस्ते पावसात उखडून गेले आहेत. केमवाडीत रस्ता चिखलमय असल्याने शाळकरी मुलांची प्रभातफेरी अक्षरशः पाण्यातून पार पडली. मंगरुळ गावातील रस्त्याचे काम अर्धवट राहिल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे.
तसेच तुळजापूर कंचेश्वर साखर कारखान्याकडे जाणारा रस्ता दरवर्षी दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांची उधळपट्टी करून पुन्हा खराब होतो. याचा फटका श्री तुळजाभवानी व स्वामी समर्थ भक्तांसह ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. दवाखान्यासाठी, शासकीय कामांसाठी नागरिकांना शहरात येताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
गौरवामुळे तीव्र संताप
सार्वजनिक बांधकाम विभागाबाबत प्रचंड तक्रारी असताना, येथील अभियंता व्ही. वाय. आवळे यांना नुकतेच पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते “सर्वोत्तम कामगिरी” बद्दल गौरविण्यात आले. मात्र रस्त्यांची अवस्था पाहता तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, “डोळ्यांवर पट्टी बांधूनच हा गौरव केला का?” असा सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे. ठेकेदार बिले काढत नाहीत, निधी मिळत नाही असे सांगून ग्रामस्थांना गप्प बसवले जात आहे. मात्र नागरिकांना हाल सोसावे लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.