तुळजापूर (प्रतिनिधी)- पुरातत्व विभागाच्या मदतीने सुरू असलेले श्री तुळजाभवानी मंदिरातील सिंहाच्या गाभाऱ्यातील जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले आहे. या कामांतर्गत सिंहाच्या गाभाऱ्याला गिलावा करण्यात आला आहे.
जीर्णोद्धाराच्या कामामुळे 1 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या कालावधीत धर्मदर्शन व देणगी दर्शन बंद ठेवण्यात आले होते. या कालावधीत भाविकांना फक्त देवीच्या मुखदर्शनाचीच व्यवस्था करण्यात आली होती. मात्र आता सिंहाच्या गाभाऱ्यातील जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाल्याने गुरुवार दि. 21 ऑगस्टपासुन पुन्हा भाविकांसाठी देणगी दर्शन व धर्मदर्शनाची व्यवस्था पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.
श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने तुळजापूर येथे येतात. मंदिरातील धार्मिक व सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी तसेच भाविकांना सुरक्षित व सुव्यवस्थित दर्शनाचा अनुभव मिळावा, या उद्देशाने मंदिर प्रशासन सातत्याने पावले उचलत आहे. जीर्णोद्धारानंतर सिंहाचा गाभारा अधिक आकर्षक व मजबूत बनला असून भाविकांना आता अधिक सुयोग्य वातावरणात देवीचे दर्शन घेता येणार आहे. या कामामुळे मंदिराचा ऐतिहासिक वैभव अधिक खुलून दिसत असून भाविक व भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.