धाराशिव (प्रतिनिधी)- मला जन्म माझ्या आई-वडिलांनी दिला. समाजामध्ये वावरण्याचे शिक्षण सुद्धा आई-वडिलांनी दिले .आई-वडिलांच्या नंतर मला ओळख जर कोणी दिली असेल तर ती श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने दिलेली आहे असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात केले.
धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई शाखा धाराशिव आणि शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे गृहनिर्माण संस्था तुळजापूर यांच्यावतीने डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.या समारंभात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की,मी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये प्रामाणिकपणे कार्य केले.प्रामाणिकपणा आणि बापूजींचा आशीर्वाद यामुळे विविध विद्यापीठांमध्ये देखील मला खूप मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसर धाराशिव या परिसराचे संचालक पद सुद्धा मला भूषविता आले.त्यामुळे जीवात जीव असेपर्यंत मी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची सेवा करत राहणार असे भावनिक उद्गार त्यांनी यावेळी काढले. सत्काराबद्दल सर्वांचे त्यांनी आभार मानले.
याप्रसंगी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संदीप देशमुख यांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. संदीप देशमुख म्हणाले की, कार्याध्यक्ष सन्माननीय प्राचार्य अभय कुमारजी साळुंखे साहेब,सचिवा आदरणीय शुभांगी गावडे मॅडम आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलेल्या संधीचे नक्कीच सोने करण्याचा प्रयत्न करेन. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष एस टी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनरावजी गोरे हे होते.अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेत कौतुक केले आणि भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. रमेश दापके यांनी केले.सूत्रसंचालन डॉक्टर वैभव आगळे यांनी केले तर आभार प्रा. आबासाहेब हंगरगेकर यांनी मानले.सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते ,शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे गृहनिर्माण संस्थेचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.