कळंब (प्रतिनिधी)- राज्य शासनाने घेतलेल्या राष्ट्रीय गुणवत्ता वाढ स्पर्धेत कळंब उप जिल्हा रुग्णालयाची राज्य स्तरावर निवड झाली असून देशपातळीवर होणा-या स्पर्धेसाठी कंबर कसली आहे.
गेल्या महिन्यात गुणवत्ता वाढ कार्यक्रम राज्यात घेण्यात आला. या स्पर्धेमध्ये धाराशिव जिल्ह्यातील बारा शासकीय रुग्णालयांनी भाग घेतला होता. त्यापैकी सहा रुग्णालयांची राज्य स्तरावर निवड झाली असून ते आता देश पातळीवरील स्पर्धेत भाग घेणार आहेत. राज्य स्तरीय निवड समितीने विविध शासकीय रुग्णालयाना भेटी देऊन तेथील कामकाज तपासून त्यांना मार्कांकन दिले. त्यामध्ये बाह्यरुग्ण, अंतररूग्ण, ऑपरेशन, आपतकालीन, माता बाल संगोपन, लसीकरण, प्रयोगशाळा, सोनोग्राफी, हॉस्पिटल व्यवस्थापन, रूग्ण कल्याण समिती, औषधे, परिसर स्वच्छता, सिक्युरिटी, नर्सिंग विभाग तपासले गेले. या सर्वांचे काम उत्तम असल्याचा निर्वाळा समितीने दिला असून राज्य स्तरावर निवड झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून प्रमाणपत्राचे वाटप रूग्णकल्याण समिती सदस्य डॉ. रामकृष्ण लोंढे, गोविंद चौधरी यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या वेळी हॉस्पिटल परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. धर्माधिकारी, डॉ. शेळके, डॉ. पाटील, डॉ. केंद्रे, डॉ. आवटे, डॉ. वाकूरे, डॉ. कवडे, डॉ. दशरथ, डॉ. प्रशांत जोशी, आर. के. सी. मेंबर्स डॉ. रामकृष्ण लोंढे, गोविंद चौधरी, विजय पवार, हेड्डा, परशुराम कोळी यांनी परिश्रम घेतले.