तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रहिवाशी चंद्रकांत साधु बनसोडे हे 1972 साली दुष्काळी परिस्थितीमुळे कामानिमित्त मुंबईला गेले. भुमीहीन व एका डोळ्याने अपंग असलेल्या चंद्रकांतने जीवनात अनेक संघर्ष करावे लागले.त्यांची पत्नी वंदना चंद्रकांत बनसोडे या सुध्दा अशिक्षित आहेत. दोघांचेही शिक्षण पहिली सुद्धा झालेले नसून आपले शिक्षण न झाल्याने मुलाला शिक्षण देऊन मोठे करायचे ध्येय त्यांच्या मनात घर करुन होते. आई धुनीभांडी व एका डोळ्याने अंध वडील मजुरी करत होते. त्यांनी आपला मुलगा श्रीधर चंद्रकांत बनसोडे यांना प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासाठी सातारा येथील श्री संत घाडगे महाराज आश्रम शाळेत ठेवले. प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षण घेतल्यानंतर मुंबई विद्यापीठातून त्यांनी एम.कॉम पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर त्यांनी 8 ऑगस्ट 2025 ला मुंबई विद्यापीठातून एल.एल.बी ही कायद्याची पदवी वयाच्या 26 व्या वर्षी घेतली. त्यांना नुकतीच मुंबई बार कौन्सिलची सनदही मिळाली आहे. काटी येथील सर्वसामान्य मागासवर्गीय कुटुंबातील तो पहिला वकिल ठरला आहे.
तुळजापूर तालुक्यातील काटी सारख्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य मागासवर्गीय व भुमीहीन व अशिक्षित मुंबईत मजुरी करणाऱ्या मजुराचा मुलगा श्रीधर बनसोडे यांनी घरातील अठरा विश्व दारिद्य्र असताना अतिशय खडतर परिस्थितीतून एका कंपनीत हेल्परचे काम करुन आईवडिलांची शिक्षणासाठी असलेली त्यांची तळमळ शिक्षण घेऊन पुर्ण केली आहे. त्यांना त्यांचे चुलते दलित मित्र नंदू बनसोडे यांचेही मार्गदर्शन लाभले.
सर्वसामान्य मागासवर्गीय गरीब कुटुंबातील अशिक्षित आई वंदना व वडील चंद्रकांत त्यास नेहमी लाडाने म्हणायचे, “तू एक दिवस मोठा वकील होणारेस, तू साहेब झाल्यावर या 'मजुराचा' मुलगा वकील झाला म्हणून मी सगळ्या गावाला सांगणार आहे.“ आईवडिलांचे हे शब्द श्रीधरने मनावर कोरले आणि जिध्दीने शिक्षण घेऊन तो आज मुंबई हायकोर्टाचा वकील झाला आहे.श्रीधरने वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी मिळवलेले यश हे प्रेरणादायी असून माझ्या या प्रवासात माझे आई-वडील यांची भक्कम साथ मिळाल्याचे तो आवर्जुन सांगतो. त्याच्या या यशाबद्दल सर्वञ कौतुक होत आहे.