भूम (प्रतिनिधी)- भूम ते वालवड गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलांची उंची कमी असल्याने ओढ्याच्या पाण्यातून लहान मुले, महिला, पुरुष, वाहनधारकांना व स्थानिकांना पाण्यातून वाट काढावी लागते. गैरसोय टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था करावी. अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
दरवर्षी भूम परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर जास्त प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे व पुलाची उंची कमी असल्यामुळे ग्रामस्थांना दोन ते तीन तास पाणी ओसरेपर्यंत थांबावे लागते. त्यामुळे संबंधित विभागाने या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी होत आहे. भूम ते वालवड जाणाऱ्या ग्रामस्थांना व येणाऱ्या ग्रामस्थांना, विद्यार्थ्यांना, महिलांना पुलाची उंची कमी असल्यामुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. संबंधित विभागाने पुलाची उंची वाढवावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख रणजीत पाटील यांनी दिला आहे.