यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत |
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥
श्रीमद्भगवद्गीता अध्याय 4/7
दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी गोकुळाष्टमी व्रत आहे. सदरील संस्कृत श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना आपण अवतार का व केव्हा घेतो हे सांगितले आहे. याच दिवशी भगवान श्रीकृष्ण दृष्टांचा संहार करण्यासाठी आणि साधुसंताना अभय देण्यासाठी पृथ्वीतलावर अवतीर्ण झाले. तसेच 15 ऑगस्ट 1947 याच दिवशी भारत देश इंग्रजाच्या जोखडातून मुक्त झाला. त्यामुळे हे दोन्ही आनंद उत्सव साजरा करण्याचा योग भारतीयांना आला आहे.
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला माध्यम करून जगताला उपदेश करतात ते म्हणतात “जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानि येईल म्हणजेच धर्माची हानी होईल अधर्माची वाढ होईल तेव्हा तेव्हा मी साकार रूपाने प्रकट होतो.“ या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने कोणत्याही धर्माचा उल्लेख केलेला नाही. त्यांना अपेक्षित असलेला धर्म म्हणजेच मानवता धर्म होय. समाजामध्ये काही दुष्ट प्रवृतिचे लोक निष्कारण भगवत प्रेमी, धर्माने चालणाऱ्या, चांगले वर्तन करणाऱ्या निरपराध पण दुर्बल मनुष्यावर नास्तिक लोक अन्याय करतात. समाजातील लोक अन्यायाचा प्रतिकार करत नाहीत किंवा प्रतिकार करण्यासाठी त्यांचे प्रयत्न कमी पडतात. त्यामुळे अन्याय करणाराची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत जाते. यावर बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की अन्याय करणारा जेवढा गुन्हेगार आहे. त्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे. अन्याय करणारे म्हणजेच अधर्मने वागणाऱ्या लोकांमुळे अधर्माची वृद्धी होते आणि धर्माचा ऱ्हास होतो. याचे प्रमुख कारण म्हणजे नाशवान पदार्थाचे आकर्षण होय. नाशवंत पदार्थाच्याकर्षण असल्यामुळे ते आपल्या संग्रह असावेत असे अधर्माने वागणाऱ्या लोकांना वाटते. अशी समान इच्छा असणारे काही लोक एकत्र येतात आणि धर्माने वागणाऱ्या लोकांवरती अन्याय करायला लागतात. त्या काळच्या परिस्थितीचे वर्णन नामदेवराय आपल्या अभंगाद्वारे करतात.
पापी जे भक्त दैते ते मातले|धरणीसीं झाले ओझे त्यांचे ॥1॥
दिधलासे त्रास ऋषीमुनी सर्वा |न पूजिती देवा कोणी एक॥
संत नामदेव |
त्या काळात असुरांचा प्रमुख असणारा कंस याने चाणुर, मुष्ठीर, तृणवृत, पुतना, मामळ, जरासंध, इ. अनेक सुरांना सोबत घेऊन राजा उग्रसेनाकडून मथुरेचे राज्य आपल्या ताब्यात घेतले आणि जनतेचा अतोनात छळ चालू केला या छळाला जनता अगदी कंटाळून गेली होती. हा छळ पृथ्वीला सहन न झाल्याने पृथ्वीने गाईचे रूप घेऊन ब्रह्मदेवा गेली.
वत्सरुपी पृथ्वी ब्रह्मयापाशीं जाय| नेत्री वाहे तोय सांगतसे| बुडविला धर्म अधर्म झाला फार|सोसवेना भार मजआता॥5|
संत नामदेव |
ब्रम्हदेव,भगवान शंकर, इंद्र इ. देवतांना घेऊन पृथ्वी भगवान श्री विष्णूकडे गेली.सर्वानीं पृथ्वीला या राक्षसांच्या जोखडा तून मुक्त करण्याची विनंती केली. तेव्हा भगवान श्री विष्णू ने आपण कंसाची बहिण देवकी आणि वसुदेव यांच्या पोटी आठव्या मुलाच्या रूपाने अवतीर्ण होणार असल्याचे सांगितले.
आकाशाची वाणी सांगे सकळाशी|
तळमळ मानशी करू नका ॥1॥
देवकीच्या गर्भा येईल भगवान |रक्षण ब्राह्मण गाई भक्त॥2॥
संत नामदेव |
भगवंताने असे आश्वासन दिल्यानंतर भगवान शंकर, ब्रह्मदेव, इंद्र आणि पृथ्वी आपल्या स्वस्थळाशी आले. त्यानंतर भगवान श्रीविष्णुने अवताराचे नियोजन करून शेषनाग याला बळीराम दादाच्या रूपामध्ये आणि माता लक्ष्मीला रुक्मिणीच्या रूपात यायला सांगितले. भगवान देविकाच्या उदरात येणार हे कळाल्यामुळे पृथ्वीवर आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
मयुरादि पक्षी नृत्य करीताती| नद्या वाहताती दोन्ही थड्या॥
भूमीवरी सडे केशर कस्तुरी |आनंद अंतरी सकाळच्या |2|
अशा रीतीने भगवान श्रीविष्णुने श्रीकृष्णाच्या रूपामध्ये श्रावण वद्य अष्टमी या दिवशी अवतार घेतला. जरी भगवंताने दृष्टांचा नाश करण्यासाठी अवतार घेतला असला तरी लागलीच दृष्टांचा नाश केला नाही. भगवंताने सर्वात आधी दुर्बलला सबल करण्याची मोहीम हाती घेतली. गोकुळामधून मथुरेला जाणारे दही दूध तूप लोणी हे प्रसंगी चोरी करून गोकुळातीलच गोपाळांच्या मुखामध्ये घातले. त्यांचे संघटन केले. संघटन झाल्यानंतर आपण गोवर्धन गिरी सारखा पर्वत सहज उचलू शकतो ही जाणीव करून दिली. जीवनामध्ये आपल्या कर्तव्याला प्राधान्य देऊन जीवन आनंदी कसे घालवावे हे ही भगवान श्रीकृष्णाने आपल्याला शिकवले. जीवनात कितीही संकटे आली तरी त्या संकटातही आनंदी राहण्याचा मंत्र भगवान श्रीकृष्णाने आपल्याला दिला. कंसाला मारल्यानंतर ते राज्य राजा उग्रसेनाच्या हाती सोपवले. यावरून श्रीकृष्णाची उदारता आपल्या लक्षात येते. इत्यादी गुणामुळे भगवान श्रीकृष्ण संपूर्ण मानव जातीला एक आदर्श राजकर्ते, कुशल संघटक, उत्तम व्यावसायिक, पुरुषोत्तम असे अनेक गुण भगवान श्री कृष्णाच्या चरित्र मध्ये आढळून येतात. भगवान श्रीकृष्ण हजारो वर्षापासून मानव जातीला प्रेरणादायी ठरत आहेत. म्हणून श्रीकृष्णाची हा जन्मदिवस गोकुळाष्टमी या नावाने साजरा केला जातो.त्यांच्याकडून प्रेरणा आपल्या जीवनात यावी हीच सदिच्छा.
ह.भ.प. बळीराम महाराज कवडे
9623740901
शब्दांकन - विलास मुळीक