उमरगा (प्रतिनिधी)- शहरात काही दिवसापासून पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे. तर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश व तेलंगणचे प्रवेशद्वार असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या उमरगा बस स्थानक व आगारात पावसामुळे खड्डयाचे साम्राज्य पसरले असुन, संततधार पावसामुळे बसस्थानकाला डबक्याचे स्वरुप आले आहे. पालकमंत्री असलेल्या परिवहन मंत्र्यांच्या भागातच बस स्थानकाची केवीलवानी दुरावस्था झाली आहे. यामुळे प्रवाशांसह बसचालकांना कसरतींना सामोरे जावून बसस्थानकात प्रवेश करावा लागत आहे.
मागील आठवडाभरात उमरगा शहर व परिसरात पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सणासुदीचे दिवस असल्याने सामसुम असलेल्या बाजारपेठेत ग्राहकांची वरदळ वाढू लागली आहे. तर शेतकरी, व्यापारी व नोकरदार वर्गाच्या चेह-यावरील चिंतेचे ढग ओसरले आहेत. भाजीपाल्याचे दर कमी होत आहेत. चारच दिवस लागलेल्या संततधार पावसामुळे परिवहन महामंडळाच्या उमरगा बसस्थानक व आगारात प्रवेशद्वारापासून बसस्थानक प्रवेशद्वारापर्यंत मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. उमरगा बसस्थानकमध्ये मोठमोठे खड्डे, कच-याचे ढिग आणि मुतारीच्या पाण्याला बाहेर जाणे साठी रस्ता नसल्याने प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. अवेळी धावणा-या खटारा बसेस यात भर घालत आहेत. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते 19 जुलै रोजी उमरगा येथे नविन बस स्थानकाचे भुमिपूजन करण्यात आले. यावेळी युध्दपातळीवर स्वच्छता मोहिम राबवून डस्ट टाकून खड्डे बुजवण्यात आले होते. मात्र पालकमंत्री गेले आणि रिमझिम पावसाने पुन्हा बस स्थानकाला खड्ड्यांनी विळखा घातला. याकडे परिवहन विभाग दुर्लक्ष करीत असल्याने बसचालकांसह प्रवाशांनाही चिखलासह पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे.
