धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्ह्यात सर्वच महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी, सततचा व ढगफुटी सदृश्य पावसाने झालेल्या  नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून त्याचा अहवाल शासनास सादर करावा. अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. 

आमदार पाटील यांनी म्हटले की, जिल्हयामध्ये मागील काही दिवसापासुन अतिवृष्टी झाल्याने पेरणी क्षेत्रावरील सोयाबीन, उडीद, मुग, तुर ही सर्वच पिके बाधीत झाली आहेत. धाराशिव तालुक्यातील धाराशिव ग्रामीण मंडळात 68.8 मिमी, ढोकी मंडळात 168.5  मिमी, जागजी मंडळात 66.3 मिमी, तेर मंडळात 168.5 मिमी, कळंब तालुक्यातील कळंब मंडळात 164.5 मिमी, इटकुर मंडळात 164.5 मिमी, येरमाळा मंडळात 82.3 मिमी, मोहा मंडळात 123.8. मिमी, शिरोढोण मंडळात 117.0 मिमी, गोविंदपूर मंडळात 168.5 मिमी तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग मंडळात 66.0  मिमी भूम तालुक्यातील ईट मंडळात 77.8 मिमी, वाशी तालुक्यातील वाशी मंडळात 145.3 मिमी, पारगाव मंडळात 91.0 मिमी, तेरखेडा मंडळात 82.3 मिमी या महसुली मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. सर्व शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 


कळंबमध्ये जास्त नुकसान

विशेषत: कळंब तालुक्यातील सर्वच महसुली मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याने सरासरी 136.8 मिमी पर्जन्याची नोंद झाली आहे. शेतामध्ये पाणी साठुन राहिल्याने सोयाबीन, उडीद, मुग, तुर इत्यादी पिकांची वाढ खुंटली आहे. तसेच फुलगळ झालेली असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात खूप मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. सोयाबीन पिकावर मुळकुज,मानकुज व शेंगकरपा अशा प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. सोयाबीन दिसायला हिरवेगार दिसत असले तरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे.  त्यामुळे सर्व पिकांचे 50 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. तसेच कमी वेळात जास्त पाऊस पडल्यामुळे नदीच्या पात्राबाहेर पाणी पडल्याने नदीने वेगळेच पात्र धारण केले आहे. जमिनी खरडून गेल्या आहेत. त्याप्रमाणे जनावरे पुरात वाहुन गेले आहेत. घरांची पडझड झाली आहे. त्याचेही पंचनामे होणे आवश्यक आहे.  धाराशिव जिल्ह्यातील सर्वच महसुली मंडळामध्ये अतिवृष्टी, सततच्या व ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन अहवाल शासनाला सादर करण्याबाबत तात्काळ योग्य कार्यवाही करावी. अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.

 
Top