परंडा (प्रतिनिधी)- येथील साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेले तुकाराम दासराव गंगावणे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या मराठवाडा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक जाणीवा, ग्रामीण साहित्य चळवळीतले योगदान, तसेच वंचित, उपेक्षित घटकांसाठी सुरू असलेल्या कार्याची दखल घेत परिषदेकडून ही निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर झाली असून, त्यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२८ पर्यंत राहणार आहे.
परिषदेच्या वतीने देण्यात आलेल्या पत्रात उल्लेख आहे की,गंगावणे आपल्या कार्यकुशलतेने परिषदेसोबतचा संवाद अधिक दृढ करतील आणि साहित्याच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवतील. त्यांच्या कार्यातून सात्विक विचारांची पेरणी होऊन, समाजात समतेचा मळा फुलावा, हीच अपेक्षा परिषदेने व्यक्त केली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभांगीताई काळभोर यांच्या स्वाक्षरीने हे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. गंगावणे यांच्या या निवडीने संपूर्ण धाराशिव जिल्हा व मराठवाडा साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ही निवड मराठवाड्याच्या साहित्यविश्वासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना साहित्यप्रेमींनी व्यक्त केली आहे.